मुंबई दि.३ – राज्यात वाढत्या कोरोना पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करुन त्यांना पुढच्या वर्गात पाठवण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र शिक्षण विभागाने नववी ते अकरावीच्या परीक्षांबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र तो लवकरच घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
पुढे बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, राज्यातील पहिली ते आठवीचे विद्यार्थ्यांचे वर्षभराचे मूल्यमापन करणे गरजेचे आहे. त्यात या विद्यार्थ्याने कशाप्रकारे अभ्यास केला हे बघितले पाहिजे. पण आताची परिस्थिती बघता हे यावर्षी ते होणं शक्य नाही. राज्यात पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास करुन त्यांना पुढच्या वर्गात पाठवण्यात येणार आहे, असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.