केज दि.६ – आमच्या मुलीला आमच्यासोबत का पाठवीत नाहीत असे कारण काढून सुनेच्या नातेवाईकांनी सासरच्या लोकांना दगडाने मारहाण केली. या मारहाणीत पती, सासू, सासरा यांचे डोके फुटून ते गंभीर जखमी झाल्याची घटना शिंदी ( ता. केज ) येथे घडली. याप्रकरणी केज पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
शिंदी येथील फिर्यादी बबन भिमराव चव्हाण यांच्या सुनेचे वडील शेषेराव माळी, भाऊ राहुल माळी, भैय्या माळी, सखाराम माळी ( रा. जांब ता. शिरूर जि. बीड ) हे चौघे ५ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शिंदी येथे चव्हाण यांच्या घरी आले होते. त्यांनी मुलीला माहेरी पाठविण्याची मागणी केली. त्यास चव्हाण कुटुंबियांनी नकार देताच वरील चौघा बापलेकांनी आमच्या मुलीला आमच्यासोबत का पाठवीत नाहीस अशी कुरापत काढुन शिवीगाळ करीत दगडाने मारहाण केली. बबन चव्हाण यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि मुलाचे डोके फुटून ते गंभीर जखमी झाले. तसेच लाथाबुक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देऊन निघून गेले. बबन चव्हाण यांच्या फिर्यादीवरून शेषेराव माळी, भाऊ राहुल माळी, भैय्या माळी, सखाराम माळी या चौघा बापलेकांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक उमेश आघाव हे पुढील तपास करत आहेत.