केज दि.७ – घराच्या गेटचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटातील ५० हजार रुपयांची रोकड आणि दागिने असा एक लाख ५४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना केज तालुक्यातील होळ येथे घडली. याप्रकरणी युसुफवडगाव पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
होळ येथील नवनाथ लक्ष्मण लाटे हे केजच्या स्वामी विवेकानंद शाळेत शिपाई पदावर नोकरीस असून त्यांचे गावी घर आहे. त्यांच्या घराच्या गेटचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घराची झडती घेत चोरट्यांनी कपाट फोडून कपाटात ठेवलेले नगदी ५० हजार रुपये, ४० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दोन गंठण, ३० हजार रुपये किंमतीचे कानातील सोन्याचे झुंबर, १४ हजार रुपये किंमतीची सोन्याची बोरमाळ, २० हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी असा १ लाख ५४ हजाराचा ऐवज घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. नवनाथ लाटे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे हे पुढील तपास करत आहेत.