Site icon सक्रिय न्यूज

फांदी मोडली अन त्यांनी विवाह मोडीत काढला…….!

फांदी मोडली अन त्यांनी विवाह मोडीत काढला…….!

कोल्हापूर दि.८ – देश कितीही प्रगतीपथावर जात असला तरी बुरसटलेल्या कांही रूढी परंपरा आजही पहायला मिळतात. जात, धर्म अन पंथ या गोष्टीत अडकलेल्या भाबड्या कल्पना अधून अधून डोके वर काढलेल्या दिसून येतात.अन  असाच एक प्रकार पुरोगामी समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात समोर आला आहे. कोल्हापूरमधील कंजारभाट समाजातील दोन तरुणींचा विवाह बेळगावमधील दोन सख्ख्या भावांशी झाला होता. विवाह थाटामाटात झाला पण त्यानंतर विवाहाच्या पहिल्याच रात्री या दोन्ही तरुणींची कौमार्य चाचणी केल्याच उघड झालं असून चक्क हे प्रकरण लग्न मोडण्यापर्यंत गेलं आहे. विशेष  म्हणजे या चाचणीत दोन्ही तरुणी नापास ठरल्याचा दावा करुन झाडाची फांदी मोडून, जात-पंचायत भरवून जात पंचायतीने हा विवाह मोडीत काढला.

या धक्कादायक प्रकाराने कोल्हापूर आणि बेळगाव सीमाभागात खळबळ उडाली असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. हा सगळा प्रकार अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लक्षात आल्यानंतर कार्यकर्त्यांनी तरुणींना आणि त्यांच्या आईला विश्वासात घेऊन राजारामपुरी पोलीस ठाणे गाठलं. अखेर दोन्ही नवरदेवांविरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान यापैकी एक नवरदेव हा भारतीय सैन्य दलात असून, त्याने आपल्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. या दोन्ही तरुणी सध्या कोल्हापूरमध्येच वास्तव्याला आहेत. आम्ही तुम्हाला नांदवणार नाही असं जात पंचायतीमार्फत सासरच्या कुटुंबीयांनी सांगितलं आहे. त्यामुळे कौमार्य चाचणी करणाऱ्या कुटुंबावर कडक कारवाई करण्याची मागणी आता होऊ लागली आहे

शेअर करा
WhatsappFacebookTwitter
Exit mobile version