अंबाजोगाई दि.८ – नोकरीनिमित्त अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या अंबाजोगाई येथील तरूण दाम्पत्याचा बुधवारी रात्री संशयास्पद मृत्यू झाला. या पती-पत्नीचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्यांनी आत्महत्या केली की त्यांचा खून झाला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. दरम्यान, या दाम्पत्याची चार वर्षीय मुलगी मात्र सुखरूप आहे.
बालाजी भारत रूद्रवार (वय ३२) आणि आरती बालाजी रूद्रवार (वय ३०) असे या मयत पती-पत्नीची नावे आहेत. अंबाजोगाईतील प्रसिद्ध व्यापारी भारत रूद्रवार यांचा बालाजी हा मुलगा होता. आयटी कंपनीतील नोकरीच्या निमित्ताने बालाजी हे सहा वर्षापूर्वी अमेरिकेत न्यू जर्सीमधील अर्लिंग्टन भागात कुटूंबासह स्थायिक झाले होते. स्थानिक वेळेनुसार बुधवारी सायंकाळी त्यांची चार वर्षीय मुलगी विहा गॅलरीत बराच वेळ एकटीच रडत थांबल्याचे दिसून आल्याने शेजाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलीसांनी भेट दिली असता घरात बालाजी आणि आरती यांचे मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आले. भारतीय वेळेनुसार गुरूवारी (दि.०८) सकाळी ९ वा. तिथल्या पोलिसांनी या घटनेबाबत भारत रूद्रवार यांना फोनवरून माहिती दिली. या घटनेमुळे रूद्रवार कुटूंबीय प्रचंड मानसिक धक्क्यात आहेत. मयत आरती या गर्भवती होत्या असे समजते.
दरम्यान, रूद्रवार दाम्पत्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. तिकडे सकाळ झाल्यानंतर शवविच्छेदनानंतरच या दाम्पत्याने आत्महत्या केली किंवा त्यांचा खून झाला हे स्पष्ट होऊ शकणार आहे. सायंकाळपर्यंत या घटनेची सविस्तर माहिती मिळण्याची शक्यता आहे.
या दुर्दैवी घटनेत चार वर्षीय चिमुकली विहा मात्र सुखरूप असून सध्या तिला शेजाऱ्यांकडे सोपविण्यात आले आहे.
या घटनेबाबत आ. नमिता मुंदडा यांनी खासदार प्रीतम मुंडे यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. अधिकारी अमेरिकेतील दूतावासाच्या संपर्कात असून गुरूवारी सायंकाळपर्यंत नेमकी घटना काय आहे याबाबत अधिकृत माहिती मिळणार आहे.