केज दि.११ – रविवारी वीकेंड लॉक डाउन च्या दुसऱ्या दिवशी केज शहरात शनिवार पेक्षा अधिक प्रतिसाद पाहायला मिळाला. शनिवारी बसस्थानकात तुरळक प्रवासी दिसून येत होते. मात्र आज पुर्णतः शुकशुकाट दिसून येत होता. तर चौकाचौकात पोलीस आणि नगरपंचायत चे कर्मचारी विनाकारण फिरणाऱ्यांची कसून चौकशी करत दंडाची आकारणी करताना दिसून येत होते.
शहरातील मेन रोड, मंगळवार पेठ आणि कानडी रोड या प्रमुख बाजारपेठ असलेल्या भागात कडकडीत बंद दिसून आला. तर पहिल्या दिवशी मोकाट फिरणा ऱ्यांची जी गर्दी दिसून येत होती तेवढी रविवारी दिसत नव्हती. मात्र वाहनांची ये जा मात्र मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. यामध्ये मालवाहू ट्रक, टेम्पो, पाण्याचे टँकर्स चा समावेश आहे. पोलिसांची पेट्रोलिंग ची गाडीही सर्वत्र फिरत असल्याने दुचाकीवरून व पायी फिरणारे अल्प प्रमाणात दिसून येत होते. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, कानडी चौक, बसस्टँड, भवानी चौक इत्यादी ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असल्याने लोक बाहेर निघताना दिसून आले नाहीत. तर दवाखाने व मेडिकल दुकाने वगळता सर्व आस्थापना बंद असल्याने लॉक डाउन ला चांगला प्रतिसाद दिसत आहे. आणि जे एव्हढ्यातूनही बाहेर पडत आहेत त्यांच्या खिशाला कात्री बसत असल्याने पुन्हा ते बाहेर निघण्याचे धाडस करत नाहीत.