Site icon सक्रिय न्यूज

या योजनेची माहिती असणे आवश्यक आहे…….!

या योजनेची माहिती असणे आवश्यक आहे…….!

मुंबई दि.१३ – महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. गेले काही दिवस दररोज 50 हजारांपेक्षा जास्त रुग्ण समोर येत आहेत. राज्यात सध्या 5 लाख 64 हजार 746 कोरोना सक्रिय कोरोना रुग्ण आढळतं आहेत. कोरोनावरील उपचार घेताना काही वेळा रुग्णालयात दाखल व्हावं लागतं. रुग्णालयातील उपचाराचा खर्च भागवणं काही वेळा अडचणीचं ठरतं. महात्मा फुले जन आरोग्य योजनेविषयी आपल्यला माहिती नसते त्यामुळे अनेकदा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. मात्र, महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी ऐनवेळी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ करावी लागते. ही धावपळ होऊ नये आणि योजनेचा लाभ व्हावा म्हणून आवश्यक कागदपत्रं तुमच्याकडं असणं आवश्यक आहे.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या www.jeevandayee.gov.in वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या जवळच्या आरोग्य सेवा किंवा Health Service Near You या लिंकवर क्लिक करा. यानंतर पुढे गेल्यानंतर तुमचा जिल्हा निवडा. रुग्णालयाचा प्रकार निवडा आणि कोणत्या प्रकराचा उपचार घ्यायचा आहे ते निवडा. तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील योजनेशी संलग्नित रुग्णालयाची माहिती मिळेल.

नोंदणी कशी करावी?

महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत हा लाभ घेण्यासाठी रुग्णालयात असणाऱ्या आरोग्य मित्रांची मदत घेता येते. योजनेमध्ये अंगीकृत असणाऱ्या रुग्णालयात आरोग्य मित्र उपलब्ध आहेत. आरोग्यमित्र रुग्णाची योजनेंतर्गत ऑनलाईन नोंदणी करतात तसेच रुग्णालयात उपचार घेतांना योग्य ते सहाय्य व मदत करतात. रुग्णांची नोंदणी आरोग्य मित्रामार्फत केली जाते. रुग्ण नोंदणीच्या वेळी रुग्णाच्या नावाची पडताळणी त्याचे ओळखपत्र पाहून केली जाते. ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरल्या जाणाऱ्या कागदपत्रांची यादी www.jeevandayee.gov.in या संकेतस्थळावर पाहायला मिळते.

 किती रुपयांचं विमा संरक्षण ?

राज्यातील जनतेला गंभीर आजारांवरील उपचारांसाठी पुर्णपणे नि:शुल्क गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधेचा लाभ विशेषज्ञ सेवांतर्गत पॅकेजेससाठी अंगीकृत रुग्णालयांमधून उपलब्ध करून देणे ही आहे. राज्यात सध्या महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसह एकत्रितपणे राबवले जाते. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबाला प्रति कुटुंब प्रति वर्ष 1.50 लाख रुपये पर्यंत विमा संरक्षण मिळते. मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी ही मर्यादा 2.50 लाख रुपये मर्यादा आहे.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ किती आणि कुणाला मिळतो? अर्ज कुठे करायचा? तर या योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी पिवळी शिधापत्रिकाधारक ,अंत्योदय अन्न योजना, अन्नपूर्णा योजना व केशरी (रु.1 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न ) शिधापत्रिका धारक कुटुंबातील नागरिक, औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका शेतकरी कुटुंबं देखील या योजनेचे लाभार्थी आहेत. शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थी, शासकीय महिला आश्रमातील महिला, शासकीय अनाथ आश्रमातील मुले,शासकीय वृद्धश्रमातील जेष्ठ नागरिक, माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडील निकषानुसार पत्रकार व त्यांची कुटुंबे तसेच कामगार विभागाने निश्चित केलेले बांधकाम व इतर बांधकाम कामगार व त्यांची कुटुंबे हे सुद्धा योजनेचे लाभार्थी आहेत.

महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत देण्यात आलेले आरोग्य ओळखपत्र, असंघटीत कामगार ओळखपत्र किंवा ही ओळखपत्र उपलब्ध नसल्यास शिधापत्रिका व छायाचित्रासह असणारे ओळखपत्र यामध्ये आधार कार्ड, मतदार कार्ड, वाहन चालक परवाना, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबाची पांढरी शिधापत्रिका आणि 7/12 उतारा आवश्यक असतो. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनानं निर्धारित केलेली ओळखपत्र यासाठी ग्राह्य धरली जातात.

दरम्यान महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभार्थी 34 निवडक विशेष सेवा अंतर्गत 996 प्रकारच्या गंभीर व खर्चिक शस्त्रक्रिया आणि 121 शस्त्रक्रिया पश्चात सेवांचा लाभ घेऊ शकतात. या योजनेत कोरोना वरील उपचारांचा देखील समावेश करण्यात आला आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात डिसेंबर 2020 पर्यंत 93884 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ झाला आहे.

शेअर करा
Exit mobile version