केज दि.१३ – एका २२ वर्षीय ट्रक चालकाने दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कळंब – अंबाजोगाई रस्त्यावरील सोनेसांगवी फाटा ( ता. केज ) येथे मंगळवारी ( दि. १३ ) उघडकीस आली. बालासाहेब आदिनाथ पांगळ असे या आत्महत्या केलेल्या चालकाचे नाव आहे.
केज तालुक्यातील कळंमअंबा येथील बालासाहेब आदिनाथ पांगळ ( वय २२ ) हा तरुण ट्रकवर चालक म्हणून काम करीत होता. त्यात त्याला दारूचे व्यसन जडले होते. मंगळवारी सकाळी ७ वाजेच्या पूर्वी बालासाहेब पांगळ या तरुणाने दारूच्या नशेत कळंब – अंबाजोगाई रस्त्यावर असलेल्या केज तालुक्यातील सोनेसांगवी फाटा येथे एका लिंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. युसुफवडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन झाल्यानंतर कळंमअंबा या गावी त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गणपती काशीनाथ शिंदे ( रा. कळंमअंबा ) यांच्या खबरेवरून युसुफवडगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सपोनि संदीप दहिफळे हे पुढील तपास करत आहेत.