नवी दिल्ली दि.१४ – रेमडेसिविरचा साठा कमी पडत असल्याने राज्यात चिंतेचं वातावरण आहे. अशातच आता रेमडेसिविरचा वापर कसा करावा यासाठी कोविड टास्कचे प्रमुख डाॅ. संजय ओक यांनी माहिती देऊन अगदी कळकळची विनंती केली आहे.
रेमडेसिविर हे जीव वाचवण्याचं औषध नसून ते सगळ्यांना देण्यात येऊ नये, अशी मागणी संजय ओक यांनी केली आहे. रेमडेसिविर हे अँटिव्हायरल प्रकारात मोडणारं औषध आहे. जेव्हा एखाद्या व्हायरसची शरीरात वाढ मोठ्या प्रमाणात होते, ती रोखण्याचं काम रेमडेसिविर करतं. मी डॉक्टरांना कळकळीची विनंती करून सांगतो की रेमडेसिविर हे लाईफ सेव्हिंग औषध नाही त्यामुळे रेमडेसिविर दिल्यानं प्राण वाचत नसल्याचं संबंधित डाॅक्टराने सांगितलं आहे.
शरीरातील ऑक्सिजनची पातळी, व्हिटामिन सी, झिंक, पाण्याचं प्रमाण उत्तम ठेवणं हे त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. रेमडेसिविर योग्य त्या रुग्णालाच दिलं जावं त्यामुळे ते सरसकट देण्याचं औषध नाही, असं डाॅ. ओक म्हणाले आहेत. काही कोरोना रुग्णांचे नातेवाईक घरीच उपचार व्हावेत यासाठी रेमडेसिविर इंजेक्शन मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. पण रेमडेसिविर हे कुठेही आणि कधीही देण्याचं औषध नसून रेमडेसिविर घरी दिलं जाऊ नये, ते त्या प्रकारचं औषध नाही, ते रुग्णालयातलं औषध आहे, असं देखील ते म्हणाले.
दरम्यान, डाॅ. ओक यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णाला 2 ते 9 दिवसांच्या कालावधीत रेमडेसिविर द्यायचं असतं. काही ठिकाणी रुग्णांना 9 ते 14 दिवस रेमडेसिविर दिलं जातं आहे. त्याचा उपयोग होत नाही. रेमडेसिविर केवळ 5 डोसेसमध्ये द्यायचं औषध आहे.