Site icon सक्रिय न्यूज

स्मशानभूमीत जागा अपुरी पडतेय, एका फुटाच्या अंतराने करावे लागले 19 जणांवर अंत्यसंस्कार……..!

स्मशानभूमीत जागा अपुरी पडतेय, एका फुटाच्या अंतराने करावे लागले 19 जणांवर अंत्यसंस्कार……..!

उस्मानाबाद दि.15 – महाराष्ट्रातील वाढत्या कोरोनाचं आणखी एक धक्कादायक चित्र समोर आलं आहे. स्मशानभूमीमध्ये जागा अपुरी पडत असल्याचं याआधी अनेक शहरांमधून समोर आलं होतं. मात्र महाराष्ट्रातील उस्मानाबादमध्ये काही अंत्यसंस्कार पुढे ढकलण्यात आले आहेत. महाराष्ट्रात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची परिस्थिती दाखवणारं हे अत्यंत दाहक चित्र आहे.

उस्मानाबाद शहराच्या जवळ असलेल्या स्मशानभूमीत आज १९ मृतदेहांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. जागा अपुरी पडल्याने ८ मृतदेहांचे अंत्यसंस्कार दुसऱ्या दिवशी ढकलण्यात आले आहेत. उस्मानाबादच्या स्मशानभूमीत जे १९ अंत्यसंस्कार झाले तेही अत्यंत दाटीवाटीने करण्यात आले, एक एक फूट जागा ठेवून सरण रचण्यात आले होते.

महाराष्ट्रात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण चिंताजनक आहे. उस्मानाबादसारखं चित्र याआधी महाराष्ट्रातील इतरही ठिकाणी पहाण्यात आलं आहे. स्मशानभूमीत जागा सोडा आता सरणासाठी लाकडं मिळणंही कठीण झाल्याची माहिती आहे, त्यामुळे कमी लाकडांमध्ये सरण पेटवावं लागत आहे.

दरम्यान आपल्या आप्तांचा अशाप्रकारे निरोप द्यावा लागत असल्याने अनेकांना अश्रू अनावर होताना दिसत आहेत. उस्मानाबादमध्ये ४९४० कोरोनाचे सक्रीय रुग्ण आहेत, मंगळवारी जिल्ह्यात कोरोनाचे ५९० रुग्ण आढळले, तर ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाचं गांभीर्य लक्षात घेऊन प्रत्येकानं काळजी घ्यायला हवी.

शेअर करा
Exit mobile version