केज दि.१५ – संपूर्ण महाराष्ट्रासह बीड जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे.आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत असून साहजिकच आर्थिक बाबतीतही ओढाताण होणारच. मात्र लोकांचे जीव वाचवण्यासाठी जिल्हा प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत असून कोविड योद्धे दिवसरात्र मेहनत घेत आहेत. त्यामुळे हा सर्व हाहाकार पाहून आपणही समाजाचे कांही देणे लागतो या भावनेतून समाजानेही पुढे येण्याची गरज आहे. आणि याचेच एक उत्तम उदाहरण समोर आले असून प्रदीप ठोंबरे नावाच्या तरुणाने समोर येत अंबाजोगाई च्या कोविड केअर सेंटरला मोठी आर्थिक मदत करत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
प्रदीप ठोंबरे हे मूळचे केज तालुक्यातील उंदरी येथील रहिवासी आहेत. परंतु अतिशय कमी वयात यश कन्स्ट्रक्शन च्या माध्यमातून महाराष्ट्रासह बाहेर राज्यातही आपले नाव केले आहे. मात्र असे जरी असले तरी गाव, जिल्हा अन तालुक्याबद्दल असलेले प्रेम त्यांनी कमी होऊ दिलेले नाही. जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाचा उद्रेक सुरू असून त्यांच्या उंदरी या गावातही कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर शिरकाव झालेला आहे. कोरोना रुग्णांना वेळेवर उपचार मिळणे गरजेचे असते व त्यासाठी मोठा आर्थिक भारही प्रशासनाला सहन करावा लागतो. आणि याचाच सारासार विचार करून आणि उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांनी सुरू केलेल्या ‘चॅरिटी अंबाजोगाई’ या ग्रुप च्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रदीप यांनी आपणही समाजाचे कांही देणे लागतो या भावनेतून अंबाजोगाई च्या कोविड केअर सेंटर ला 51 हजारांची आर्थिक मदत रोटरी क्लब अंबाजोगाई यांच्याकडे सुपूर्द करून माणुसकीचे दर्शन घडवले आहे.
दरम्यान सध्या कोरोना केअर सेंटर मध्ये रुग्णांना सर्व सुविधा उपलब्ध होण्यासाठी सर्व प्रकारच्या मदतीची गरज असून प्रदीप सारख्या दानशूर व्यक्तींनी मदतीचे हात पुढे करण्याची गरज आहे.ज्यांना शक्य असेल त्यांनी आरोग्य यंत्रणेला बळकटी देण्यासाठी स्वखुशीने मदतीचे हात पुढे केले तर नक्कीच त्यांची मदत कुणाचा तरी जीव वाचवण्यासाठी कामी येणार आहे.