केज दि.१७ – मागच्या तीन दिवसांपासून कडक संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.मात्र कांहीही कारणे सांगून रस्त्यावर फिरणारे मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत.त्यामुळे केज शहरात संचाबंदी आहे की नाही ? असे चित्र निर्माण झाले आहे. आणि याच पार्श्वभूमीवर मोकाट फिरणा ऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शनिवारी खुद्द उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांनी केज शहरात दाखल होऊन बसस्थानकासमोर उभे राहत मोकटांचा चांगलाच समाचार घेतल्याने रस्त्यावरील गर्दी कमी झाल्याचे दिसून आले.
केज तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाची रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली असून सर्वसामान्य लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. मात्र कितीही आवाहन केले तरी मोकटांचा मुक्त संचार सुरू आहे. केजचे तहसीलदार दुलाजी मेंडके, नायब तहसिलदार सचिन देशपांडे शहरात दिवसरात्र फिरून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न जरी करत असले तरी वेगवेगळे कारणे सांगून लोक फिरतच आहेत.त्यामुळे या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपविभागीय अधिकारी शरद झाडके केजला आले होते व त्यांनीही ही परिस्थिती स्वतः पाहिली.
दरम्यान शरद झाडके हे स्वतः बसस्थानकासमोर उभे राहिले आणि विनाकारण इकडे तिकडे येणाऱ्या जाणाऱ्या बेशिस्त नागरिकांचा चांगलाच समाचार घेतला. त्यामुळे शनिवारी दररोज होणारी गर्दी कांही वेळाने कमी झाल्याचे दिसून आले. शहरात केवळ मेडिकल दुकाने वगळता किराणा दुकानांसह सर्वच दुकाने बंद आहेत. तसेच अश्या बेशिस्त लोकांवर आता यापुढे थेट पोलीस कारवाई करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया शरद झाडके यांनी सक्रीय न्युजशी बोलताना दिली.यावेळी तहसीलदार दुलाजी मेंडके, नायब तहसिलदार सचिन देशपांडे, नगरपंचायत चे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिसांची उपस्थिती होती.