केज दि.१८ – तालुक्यातील ग्रामीण भागातही कोरोनाने पाय घट्ट रोवले आहेत. यामध्ये नियम पाळणारे लोकही बेशिस्त लोकांमुळे या आजाराला बळी पडत आहेत. प्रत्येक गावात जनजागृती केली जात असली तरी कांही लोक मास्कचा वापर करत नाहीत. त्यामुळे सोनिजवळा गावच्या ग्रामपंचायत ने दंड वसुलीचा ठराव घेत कोरोनाचा संसर्ग रोखण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
केज पासून हाकेच्या अंतरावर असलेले सोनी जवळा ह्या गावातही कोरोनाने शिरकाव केला असून कर्त्या माणसाला आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे गावात दहशत पसरली असून कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र आवाहन करूनही लोक नियम पाळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर ग्रामपंचायत ने दंड आकारण्याचा निर्णय घेतला असून पहिल्याच दिवशी 14 लोकांवर कारवाई करत 2800 रुपये दंड वसूल करण्यात आला.
त्यानुसार गावचे सरपंच मुकुंद गायकवाड व ग्रामविकास अधिकारी आर.व्ही.वरपे यांनी ग्राम रोजगार सेवक आणि पाणी पुरवठा कर्मचारी यांना एक लेखी आदेश दिला आहे.त्यामध्ये सदरील कर्मचाऱ्यानी सकाळी 7.30 ते रात्री 8 वाजेपर्यंत गावात थांबून जे ग्रामस्थ मास्क चा वापर करत नाहीत त्यांच्याकडून सक्तीने 200 रुपये दंड आकारून ते पैसे ग्रामपंचायत च्या खात्यावर जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कितीही प्रेमाने सांगितले तरी लोक ऐकत नसल्याने प्रत्येक गावात ग्रामपंचायत ने असे वेगवेगळे उपक्रम राबवून आपले गाव कोरोना संसर्गापासून वाचवले तर कोरोना आटोक्यात यायला वेळ लागणार नाही. मात्र गावकऱ्यांनी ही सहकार्य करणे अपेक्षित आहे.