Site icon सक्रिय न्यूज

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं अंदाज चुकवला…..!

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं अंदाज चुकवला…..!

मुंबई दि.१९ – राज्यात ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंधांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आलेली दिसत नाही. दैनंदिन रुग्णसंख्या वाढत असून राज्य सरकारची चिंता वाढली आहे. दरम्यान राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन लागण्याचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री दोन दिवसांत यासंबंधी निर्णय घेतील अशी माहिती त्यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत दिली. दिल्लीत नुकताच सहा दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आलेला असून कशा पद्धतीने अमलबजावणी होणार आहे याची माहिती घेत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

आपण लॉकडाउन केलेला नाही. अनेक व्यापाऱ्यांचा लॉकडाउनला विरोध होता. पण आज व्यापारी किंवा जीवनाश्यक वस्तूंची तसंच इतर लहान दुकानं असणारेही लॉकडाउन १०० टक्के करा अशी मागणी करत आहे. अनेक जिल्ह्यांमध्येही लोक मागणी करत असून आम्ही मुख्यमंत्र्यांना यासंबंधी माहिती दिली आहे. दोन दिवसांत कडक लॉकडाउनसंबंधी निर्णय अपेक्षित आहे. मुख्यमंत्री इतरांशी चर्चा करुन तो निर्णय घेतील,” असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं अंदाज चुकवला. सगळ्यांना वाटत होतं, लाट सौम्य येईल पण ही लाट तीव्र निघाली. कोणालाच याची कल्पना नव्हती, असं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.

दिल्लीने कडक लॉकडाउन केला असून त्याची माहिती आम्ही घेत आहोत. लॉकडाउन कसा आहे, त्यांची नियमावली काय आहे यावर चर्चा करण्याचा निर्णय झाला आहे,” अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. दिल्लीच्या लॉकडाउनचं काय स्वरुप आहे? लोकलसंबंधी काय निर्णय घेतला आहे? अत्यावश्यक सेवांना काय सूट दिली आहे? ही सर्व माहिती गोळा केल्यानंतर स्वरुप ठरवून नंतर घोषणा करण्याचा आमचा विचार आहे असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.

शेअर करा
Exit mobile version