केज दि.२० – जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. उपचारविना रुग्णांना जीव गमावण्याची वेळ येऊ नये यासाठी तालुकास्तरावर सुद्धा उपचाराची क्षमता वाढवत आहे. त्याच अनुषंगाने केज येथील उपजिल्हा रुग्णालयात २५ खाटांच्या डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर (डिसीएचसी) ला मंजुरी देण्यात आली असून तालुक्यातील नागरिक समाधानी आहेत. मात्र या ठिकाणावरून इतरत्र पाठवलेले डॉक्टर्स परत बोलावण्याची आवश्यकता आहे.
केज शहरात दोन सीसीसी कार्यान्वित आहेत. त्यामध्ये सध्या तिनशेच्या वर रुग्ण दाखल आहेत. दिवसेंदिवस तालुक्यातील रुग्ण संख्या वाढत चालली असून केवळ सीसीसी वर भागणार नाही.त्यामुळे दि.१४ एप्रिल रोजी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. मात्र सदरील ठिकाणचे ९ डॉक्टर्स प्रतिनियुक्तीवर इतरत्र पाठवण्यात आले आहेत तर दोन डॉक्टर्स अनधिकृत रजेवर आहेत. त्यामुळे आहे त्या डॉक्टर्सवर इतर आजाराच्या पेसेंट चा भार आलेला आहे. सदरील उपजिल्हा रुग्णालयात डिलिव्हरी, अपघात तसेच इतर अन्य आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर भरती होत असतात. त्यामुळे अगोदरच स्टाफ अपुरा असून कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी जास्तीचे मनुष्यबळ असणे गरजेचे आहे. कारण कोविड रुग्णांबरोबर इतर रुग्णांनाही सेवा मिळणे गरजेचे आहे.
तसेच २५ रुग्ण ज्यांना की ऑक्सिजन ची गरज आहे अश्यांवर या सेंटर मध्ये उपचार होणार असल्याने दररोज पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध असणे गरजेचे आहे. त्यामुळे या सर्व बाबींची पूर्तता करून सेंटर कार्यान्वित केले तर तालुक्यातील बहुतांश रुग्णांना याचा फायदा होणार असल्याने तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.