केज दि.२१ – शहरात दुचाकी लांबवण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. शहरातील उमरी रोड वरील सहयोग नगर भागातील एका घरासमोर उभी केलेली मोटारसायकल दुचाकी चोरांनी पळवल्याने रहिवाशांमध्ये भीती निर्माण झाली आहे. कारण मागच्या आठ दिवसातील ही दुसरी घटना आहे.
केज शहरातील उमरी रोड वरील सहयोग नगर भागात महाराष्ट्र बँकेतील कर्मचारी फुलचंद हरिभाऊ सोनवणे यांचे घर आहे. मंगळवारी रात्री त्यांचे भाऊ विजय सोनवणे यांनी रात्री 8.30 च्या सुमारास घरापुढे पॅशन मोटारसायकल (एम.एच.44 एफ 1263) लावली होती. मात्र कांही वेळातच ते बाहेर आले असता त्यांना दुचाकी घरासमोर नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी कुटुंबातील इतर सदस्यांना चौकशी करून इतरत्र शोध घेतला मात्र दुचाकी मिळून आली नाही.
दरम्यान सदरील परिसरातील मागच्या आठ दिवसातील ही दुसरी घटना आहे. आठ दिवसांपूर्वी शिक्षक कॉलनीतील एका घरासमोरून एचपीएम च्या एका कर्मचाऱ्याची मोटारसायकल रात्रीच्या सुमारास पळवली होती. मात्र तात्काळ गाडीचा शोध घेण्यासाठी धावल्याने चोरट्यांनी दुचाकी सोडून पळ काढल्यामुळे अनर्थ टळला. मात्र शहरात वारंवार दुचाकी पळवण्याच्या घटना घडत असल्याने रहिवाशांमध्ये भीती पसरली आहे.