केज दि.२१ – बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत आहेत. शासकीय तसेच खाजगी रुग्णालयात बेड कमी पडू लागले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातही कोवीड केअर सेंटर सुरू केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील बनसारोळा येथे ५० खाटांच्या कोविड केअर सेन्टरला मंजुरी मिळाली असून परिसरातील कोरोना रुग्णांची सोय होणार आहे. मानवलोक तसेच बनेश्वर शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सदरील कोविड सेंटर उभारण्यात येत असल्याची माहिती बनेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. नरेंद्र काळे यांनी दिली. यामध्ये मानवलोक खाटा, गाद्या आणि इतर साहित्य मोफत देणार असून आरोग्य विभाग कर्मचारी व औषधी उपलब्ध करून देणार आहे.
सौम्य लक्षणे असणाऱ्या बाधितांना गावातच उपचार मिळावेत, यासाठी ग्रामीण भागातच कोविड केअर सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बनसारोळा येथे सीसीसी कार्यान्वित करण्यासाठी मंजूरीही मिळाली आहे. यासाठी बनेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भागवत गोरे व सचिव डॉ. नरेंद्र काळे यांच्या पुढाकारातून इमारतीची सोय करण्यात आली आहे. या सीसीसीत लागणारे साहित्य पुरविण्याची जबाबदारी अंबाजोगाई येथील मानवलोक संस्थेने घेतली असून आपत्ती आणि अडचणीच्या काळात मानवलोकने सामान्यांना आधार देत सामाजिक बांधिलकी जपली आहे. या ठिकाणी ५० खाटा उपलब्ध असणार असल्याने तालुक्यात आणखी ५० खाटांची भर पडली आहे. या सीसीसीमध्ये लागणारे डॉक्टर, परिचारीका व इतर मनुष्यबळ तसेच औषध पुरवठा आरोग्य विभागाकडून पुरविला जाणार आहे. त्याचबरोबर मानवलोक व बनेश्वर संस्थाही औषधी तसेच कर्मचारी वर्गाची सोय करणार आहे. दोन दिवसांत सदरील सेंटर कार्यान्वित होणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी दिली.