Site icon सक्रिय न्यूज

सॅल्युट…….! हे आहेत खरे हिरो…….! यांचा दानशूरपणा पाहून कुणाचेही डोळे पानावतील……..!

मुंबई दि.२१ –  मागील वर्षी कोरोनाने थैमान घातलं होतं. कोरोना सारख्या रोगाचा अचानक जगभरात प्रसार झाल्यानं संपुर्ण जग बंद झालं होतं. तर आरोग्य सुविधांवर सरकारला खर्च करावा लागला होता. आरोग्याच्या बाबतीत सुविधांची किती कमतरता आहे, हे सर्वांनाच जाणवू लागलं. त्यानंतर महाराष्ट्राने देखील चांगली आरोग्य सुविधा उभा केली होती. पण त्यानंतरही काहींचे प्राण गेले. असाच एक प्रकार घडल्यानं शहानवाज शेख नावाच्या तरूणाला धक्काच बसला होता. त्यानंतर त्यांनं सर्वाची मदत करण्याचं ठरवलं.

मागील वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत शहानवाज शेखच्या एका मित्राच्या बहिणीला कोरोनाची लागण झाली होती. मात्र वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्यामुळे मित्राच्या बहिणीचा रिक्षामध्येच मृत्यू झाला. याच गोष्टीचा शहनवाजला मोठा धक्का बसला. त्यानंतर त्याने लोकांचा जीव वाचवण्यासाठी काम करण्याचं ठरवलं. कोरोना ग्रस्त रूग्णांना ऑक्सिजन सिलेंडर मिळावा यासाठी त्याची धडपड चालू झाली.

शहानवाजला ऑक्सिजन सिलेंडर पुरवण्यासाठी भांडवलाची गरज होती. शेवटी काही हाती न लागल्यानं त्यानं स्वतःची फोर्ड एंडेव्हर ही कार विकली. त्यातून मिळालेल्या पैशातून त्यांने 60 ऑक्सिजन सिलिंडर खऱेदी केले. तर आणखी 40 सिलिंडर भाड्याने घेतले. सद्यस्थितीत त्याच्याकडे आता 200 सिलेंडर आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेतच त्याने 4000 लोकांना मदत केली आहे. तर आता देखील तो मोठ्या प्रमाणात लोकांना मदत करत आहे.

दरम्यान, सध्याची स्थिती पाहता त्यांने मलाड येथे वाॅर रूम तयार केलं आहे. तर त्याला दररोज 500 हून अधिक फोन येतात. तरी देखील आपण करत असलेली मदत अपुरी आहे, असं त्याला वाटतं. कोरोनाकाळातील त्यांच्या या कार्यमुळे अनेकांचे जीव वाचले आहे. त्याचं हे कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे.

तर मुंबईतील एका प्रसिद्ध डॉक्टरांना कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीत एका दानशूराचं दर्शन घडलं. गरीब कोरोनाग्रस्तांसाठी माझा पगार घ्या, या भाजीवाल्याच्या मुलाने पाठवलेल्या व्हाट्सएप मेसेजमुळे डॉक्टरांचेही डोळे पानावले आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांना आरोग्य सुविधांसाठी लढावं लागत आहे. यासाठी दात्यांनी पुढे येऊन गरजूंसाठी आर्थिक हातभार लावावा, असं आवाहन वारंवार केलं जातं आहे. अशा वेळी कोणी पैशांची मदत करत आहे, कोणी कोव्हिड रूग्णालयात जागा उपलब्ध करुन देत आहे, कोणी घरचा आहार कोरोनाग्रस्त रुग्णांना पुरवत आहे, कोणी कठीण काळात मानसिक पाठिंबा देत आहे, तर कोणी दुःखद प्रसंगात अंत्यसंस्कारासाठी हातभार लावत आहे. कुठल्याही स्वरुपातील मदत छोटी नसते, याचं वेळोवेळी दर्शन होत आहे.

मुंबईतील खार भागातील हिंदुजा रुग्णालयातील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. स्नेहिल मिश्रा यांनी नुकतच ट्विटरवर आपल्या भाजीवाल्या रुग्णाच्या मुलानं पाठवलेल्या व्हॉट्सअॅप मेसेजचा स्क्रीनशॉट ट्वीट केला आहे. माझा रुग्ण भाजी विक्रेता आहे. हा मेसेज त्याच्या मुलाने पाठवला आहे. माझ्याकडे शब्द अपुरे पडले, हे खरे हिरो आहेत, असं मिश्रांनी लिहिलं आहे.

दरम्यान, हाय सर, हॉस्पिटल व्हेंटिलेटर किंवा औषधांचा खर्च भागवू न शकणारे एखादे कोरोनाग्रस्त गरीब कुटुंब आहे का? असल्यास मला कळवा, मला माझा पगार देऊन त्यांचा जीव वाचवायचा आहे’ असा भारावणारा मेसेज पाठवला. चेहरा नसलेल्या अशा हिरोंचं फारसं कौतुक होत नाही. त्यामुळेच डॉ. स्नेहिल मिश्रा यांनी आवर्जून हा मेसेज सोशल मीडियावर शेअर केला. हे ट्वीट प्रचंड व्हायरल झालं असून सगळ्यांनीच त्याला दाद दिली आहे. अनेक जणांनी त्याच्या पावलावर पाऊल टाकत गरीब कोरोना रुग्णांना मदत करण्याची तयारीही दर्शवली आहे.

मंचर येथील शिवसेनेचे नेते दत्ता गांजाळे या नेत्यानं सर्व धर्मियांच्या अंत्यविधीचा जणू वसाच हाती घेतला आहे. आत्तापर्यंत सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी 114 मृतदेहांचे सर्व विधी स्वतः पार पाडले आहेत. त्यांचं हे कार्य सर्व राजकारण्यांना जणू एक चपराक आहे.

                              बुरसटलेल्या राजकारणात समाजकारण करणारे, माणुसकी जपणारे शिवसेनेचे नेते दत्ता गांजाळे, पुण्याच्या मंचरचे सरपंच असताना गावातील एकाचा कोरोनाने मृत्यू झाला. तेव्हा नातेवाईक देखील मृतदेहाला स्पर्श करत नव्हते तेव्हा गांजाळेंनी तो अंत्यविधी पार पाडला. तेव्हापासून हाती घेतलेला वसा त्यांनी मागे टाकलाच नाही. गांजाळे सरपंच होते तेंव्हा त्यांनी 56 आणि त्यानंतर 58 असे आत्तापर्यंत 114 अंत्यविधी पार पाडले आहेत, त्यांच्या सहकार्याविना हे कार्य शक्यच नव्हतं. गांजाळेंनी या कार्यात धर्म, जात या सर्व विचारांना ही मागे टाकलं आहे, म्हणूनच सर्व धर्मीय त्यांना देवदूत म्हणतात.
शेअर करा
Exit mobile version