Site icon सक्रिय न्यूज

रुग्णालया बाहेर गर्दी करणारे नातेवाईकच निघाले कोरोना पॉजिटिव्ह, उस्मानाबाद शहरात केलेल्या कारवाई दरम्यान धक्कादायक माहिती उघड………!

रुग्णालया बाहेर गर्दी करणारे नातेवाईकच निघाले कोरोना पॉजिटिव्ह, उस्मानाबाद शहरात केलेल्या कारवाई दरम्यान धक्कादायक माहिती उघड………!

उस्मानाबाद दि.२१ –  उस्मानाबादमध्ये कोरोना रुग्ण रुग्णालयात भरती झाल्यानंतर नातेवाईक रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. प्रशासनाकडून वारंवार सांगूनही नातेवाईक ऐकत नसल्याने प्रशासन मेटाकुटीला आलं आहे. रुग्णालयाबाहेर गर्दी केल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची दाट शक्‍यता असल्याने प्रशासनाकडून नातेवाईकांना वारंवार गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात येत आहे, पण नातेवाईक प्रशासनाच्या विनंतीला केराची टोपली दाखवत असल्याने उस्मानाबादमध्ये पोलिसांकडून गर्दी करणाऱ्या नातेवाईकांची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आली.

उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी रात्रीच्या दरम्यान ऑक्सिजन पुरवठा सुरळीत आहे की नाही हे पाहण्यासाठी रुग्णालयात पाहणी दौरा केला. त्या दरम्यान रुग्णालयाबाहेर त्यांना 70 ते 80 नातेवाईक असल्याचं दिसून आलं. त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती देऊन सर्वांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश दिले, पोलिसांना पाहून त्यापैकी काही जण पळून गेले. पण जवळपास 45 जणांची यावेळी कोरोना टेस्ट करण्यात आली.

विशेष म्हणजे यामध्ये तब्बल 19 जणांची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ माजली आहे. हे सर्व लोक सुपर स्प्रेडर ठरू शकतात. अशी भीतीही सध्या व्यक्त करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्रातील इतरही रूग्णालयात अशीच परिस्थिती असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

शेअर करा
Exit mobile version