केज दि.२१ – जिल्हा गौण, खनिकर्म विभागाने केज तालुक्यातील सुर्डी शिवारात छापा मारून ५० ब्रास वाळू, एक जहाज, बोट, सक्षम पंप तसेच मुरूम उत्खनन करणारे पोकलेन, चार हायवा टिपर जप्त केल्या आहेत. याप्रकरणी युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केज तालुक्यातील सोनेसांगवी व सुर्डी शिवारात मांजरा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून वाळू साठा करून ठेवल्याची तक्रार माळेगावचे उपसरपंच शरद दोडके तसेच भिसे राजकुमार काशीनाथ (रा.सुर्डी) यांनी बीडच्या जिल्हा गौण खनिकर्म विभागाकडे केली होती. त्यानुसार बुधवारी दुपारी जिल्हा खनिज अधिकारी पी. एस. अर्सूल, माजलगाव येथील तहसीलदार वैशाली पाटील, जिल्हा गौण खनिकर्म विभागाचे अव्वल कारकून हर्षद कांबळे, नितीन जोगदंड, संदीप खुरुद यांच्या पथकाने सदर ठिकाणी छापा मारला असता त्याठिकाणी ५० ब्रास वाळू, एक मोठी जहाज, एक छोटी बोट, सक्षम पंप आढळून आल्याने पंचनामा करीत जप्त करण्यात आला. तर याच परिसरात विना परवाना मुरूम उत्खनन करणारे चार हायवा टिपर, एक पोकलेन मशीन आढळून आल्याने ते जप्त करीत केज येथील तहसील कार्यालयात आणून लावण्यात आले आहेत. यावेळी केज तहसीलचे मंडळ अधिकारी बाळासाहेब फरके, लिपिक शिवाजी तपसे उपस्थित होते. याप्रकरणी मंडळ अधिकारी बाळासाहेब फरके यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तिविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.