Site icon सक्रिय न्यूज

मिशन झिरो डेथ अभियानाला केज तालुक्यात वेग.……!

मिशन झिरो डेथ अभियानाला केज तालुक्यात वेग.……!
केज दि.२२ – वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाच्या वतीने वेगवेगळ्या माध्यमातून शर्थीचे प्रयत्न होत आहेत. नियमांचे पालन करण्यासह दुखणे अंगावर न काढता तात्काळ कोरोना टेस्ट करून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आणि याचाच एक भाग म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेल्या मिशन झिरो डेथ अभियानानेही तालुक्यात वेग घेतला आहे.
            जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा वाढत जात असल्याने जिल्हा प्रशासना समोर अनेक अडचणी येत आहेत. वाढती रुग्ण संख्या पाहून कोविड केअर सेंटर तसेच हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणावर बेड वाढवण्यात येत आहेत. तसेच नवीन कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यात येत आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील नागरिकांना टेस्ट करून घेण्याबरोबरच लसीकरणाला प्रोत्साहित करण्यात येत आहे. परंतु बहुतांश लोक टेस्ट तसेच लसीकरणास प्रतिसाद देत नसल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी 19 एप्रिल पासून संपूर्ण जिल्ह्यात मिशन झिरो डेथ अभियान सुरू केले असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
            मिशन झिरो डेथ अभियानांतर्गत केज तालुक्यात गशिअ सुनील केंद्रे तसेच तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 1200 शिक्षकांची नेमणूक केलेली आहे. सदरील अभियानात प्रत्येकी दोन शिक्षकांना 100 घरांची जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये सदरील शिक्षक व अंगणवाडी सेविका प्रत्येक गावातील प्रत्येक घरी जाऊन कुटुंबातील सदस्यांची चौकशी करून ऑक्सिजन लेवल, ताप इत्यादी चेक करून कांही लक्षणे दिसून आली तर संबंधित व्यक्तीस कोरोना टेस्ट करून घेण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत.तसेच त्यांची अद्यावत नोंद ठेवून प्रत्येक कुटुंबावर आरोग्याच्या दृष्टीने लक्ष ठेवून आहेत.
             सदरील अभियानामुळे जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबातील सर्व सदस्यांची आरोग्य विषयक माहिती संकलित होत असल्याने जिल्ह्यातून कोरोना हद्दपार होण्यास या अभियानाचा मोठा फायदा होणार आहे. आरोग्य विभागाच्या वतीने सदरील कर्मचाऱ्यांना पल्स ऑक्सिमिटर पुरवण्यात आले आहेत. मात्र जिथे याची कमतरता भासेल तिथे स्थानिक ग्रामपंचायत ने ऑक्सिमिटर खरेदी करून देण्याचे सुचवण्यात आलेले आहे. त्यामुळे आपल्या गावचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी पुरेशे साधने पुरवण्याची आवश्यकता आहे.
          दरम्यान या अभियानात तालुक्यात सुमारे 1200 शिक्षक कामाला लागले असले तरी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग साठी 28 शिक्षक, टेस्ट केलेल्या व्यक्तींमध्ये बाधित असलेले तसेच जे बाधित नाहीत अशा लोकांची नोंद करण्यासाठी 10 शिक्षक तर उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण प्रक्रियेत 3 शिक्षकांची नेमणूक केली असल्याने कोरोना निर्मूलन अभियानात तालुक्यातील शिक्षक महत्वाची जबाबदारी पार पाडत असल्याची माहिती गशिअ सुनील केंद्रे यांनी दिली.

शेअर करा
Exit mobile version