कोल्हापूर दि.२२ – कोल्हापूरात लसीकरणाचा मोठा सकारात्मक प्रभाव दिसून आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कोल्हापुरात कोरोना लसीकरण केलेल्या 7 लाख लोकांपैकी केवळ 55 जणांनाच कोरोनाची बाधा झाल्याचं समोर येत आहे. त्यामुळे आता कोरोना रूग्णवाढ रोखण्यासाठी लसीकरणाचा परिणाम होताना दिसत आहे.
कोल्हापुरात आतापर्यंत एकूण 7 लाख लोकांना लसीकरण करण्यात आलं आहे. या 7 लाख लोकांपैकी केवळ 55 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. लसीकरणानंतर कोरोना होण्याचं प्रमाण केवळ 0.01% आहे. त्यामुळे जिल्हाप्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दररोज 30 ते 40 हजार लोकांना लस दिली जात आहे, असं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
जिल्ह्यात 40 वर्षावरील सुमारे 15 लाख लोकांचं लसीकरण पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. आतापर्यंत जवळपास 7 लाख लोकांनी लस घेतली आहे. त्या तुलनेत लस घेतलेल्या लोकांना कोरोना होण्याचं प्रमाण खूप कमी आहे. लस घेतलेल्या लोकांची प्रतिकारशक्ती वाढल्याने कोरोना झाला तरी त्याचा जास्त त्रास होत नाही. त्यामुळे कोरोनापासून सरंक्षण करण्यासाठी सर्वांनी लसीकरण करून घेणं आवश्यक आहे, असं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ योगेश साळे यांनी संगितलं आहे.
दरम्यान, लस घेऊन कोरोना झालेल्यांना कोणतीही तीव्र लक्षणे दिसत नाहीत. त्यांना ऑक्सिजन व्हेंटिलेटरची गरज भासत नाही. त्यांना डॉक्टरांच्या सल्याने घरीच उपचार घेता येतो. लस घेतलेल्यांनी फारशी भीती बाळगण्याची गरज नाही. लसीकरण झाल्यानंतर कोरोना बाधित होण्याचं प्रमाण जरी कमी असलं तरी कोरोना प्रतिबंधक नियम पाळावे लागणार आहे.