केज दि. तालुक्यातील युसूफवडगांव येथील कारगिल योध्दा अशी ओळख असणारे माजी सैनिक शिवराज खरबड वय(४४) यांचे काल रात्री बार्शी येथील दवाखान्यात कोरोनाने दुख:द निधन झाले,तर सहा दिवसापुर्वी त्यांच्या वडिलांचे आजारपणामुळे निधन झाले होते.
भारतीय सैन्यात दलात तब्बल १९ वर्षे राहुन त्यांनी भारत मातेचे संरक्षण केले होते.गेल्या ७/८ वर्षापुर्वी ते सैन्य दलातुन निवृत्त होऊन गावी आले व पुढील भविष्याचा विचार करून त्यांनी उदरनिर्वाहासाठी गावात कापड दुकान टाकले होते. सर्व काही व्यवस्थित सुरू असतानाच त्यांना दहा दिवसापुर्वी कोरोना झाल्याचे निदान झाले असता उपचार करण्यासाठी त्यांना लोखंडी सावरगाव येथील कोविड सेंटरमध्ये भर्ती करण्यात आले होते. परंतु तब्येत जास्तच बिघडत चालल्याने त्यांना पुढील उपचारासाठी बार्शी येथील खाजगी रूग्णालयात नेण्यात आले होते. त्या दरम्यान २/३ दिवसानंतर त्यांच्या वडिलांचे आजारपणामुळे निधन झाले. त्यांच्या तब्येत्तेवर याचा परिणाम होईल म्हणून याची त्यांना कल्पना न देताच नातेवाईकांनी व मित्रपरिवाराने त्यांच्या वडिलांचे अंत्यसंस्कार उरकुनही घेतले होते.
दरम्यान ८/९ दिवसानंतर त्यांच्या तब्येत सुधारलीही होती. मात्र काल रात्री त्यांच्या तब्येत अचानक बिघडली आणि त्यातच त्यांचे दुख:द निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी व एक मुलगा असा परिवार आहे.