केज दि.२३ – राज्य सरकारने जाहीर केलेल्या लॉक डाउन ची तात्काळ अंमलबजावणी सुरू झाली आहे. बाहेर जिल्ह्यातून केज शहरात येणाऱ्या नागरिकांची मोठी संख्या लक्षात घेऊन तालुका हद्दीवर दोन ठिकाणी चेकपोस्ट कार्यान्वित करण्यात आले असून सदरील चेकपोस्ट वर पोलीस कर्मचाऱ्यांना मदतनीस म्हणून 24 शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.
राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता 1 मे पर्यंत संपूर्ण लॉक डाउन ची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा बंदीसह आंतरजिल्हा प्रवासासाठी ई पास ची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांवर नजर ठेवण्यासाठी केज तालुका हद्दीवर असलेल्या माळेगाव तसेच बोरगाव हनुमंत पिंप्री या दोन ठिकाणी पोलीस तैनात असणार आहेत. तर त्यांच्या मदतीला गटशिक्षणाधिकारी सुनील केंद्रे यांच्या नियोजनातून एकूण 24 शिक्षकांचीही नेमणूक करण्यात आली आहे. सदरील ठिकाणी येणाऱ्या प्रवाशांची कसून चौकशी करून त्यांच्याजवळ परवानगी असेल तरच प्रवेश देण्यात येणार आहे. आणि पास नसेल तर कोणत्याही सबबीवर त्यांना प्रवेश दिला जाणार नाही.
तसेच पास असलेल्या प्रवाशांना प्रवेश दिला तरी जर ते ग्रामीण भागातील असतील तर त्यांची माहिती गटविकास अधिकारी यांना आणि शहरी भागातील असतील तर त्यांची माहिती नगरपंचायत चे मुख्याधिकारी यांना तात्काळ देण्याचे सूचित करण्यात आले आहे.
दरम्यान केज पासून 18 किमी अंतरावर असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब शहरातून केजकडे येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर असली तरी या दोन चेकपोस्टमुळे सातत्याने होणारी वर्दळ थांबणार असून कोरोना संसर्गाचा धोका कमी होण्यास मोठी मदत होणार असल्याचे मत तहसीलदार दुलाजी मेंडके यांनी व्यक्त केले.