केज दि.२५ – मागच्या दोन महिन्यांपासून बंद असलेले एचपीएम चे काम संथ गतीने का होईना केज शहरात सुरू झाले आहे. मात्र काम बंद पडण्याच्या अगोदर टाकलेला पहिला थर पूर्णपणे उखडून गेला असून त्याच्यावरच दुसरा थर टाकण्याचा घाट एचपीएम चा दिसून येत असल्याने तसे झाले तर अतिशय निकृष्ट दर्जाचे काम पूर्ण होणार आहे.
मागच्या सहा महिन्यांपासून एचपीएम च्या माध्यमातून शहरांतर्गत रस्त्याचे काम सुरू केले आहे. मात्र चारदोन दिवस काम करून दोनदोन महिने काम बंद ठेवल्या जात असल्याने आणखी अर्धे सुद्धा काम झालेले नाही. रेंगाळत पडलेल्या कामामुळे वाहतुकीवर प्रचंड ताण येत असून व्यापारी मेटाकुटीला आले आहेत. तर सर्वसामान्य नागरिक धुळीने परेशान झाले आहेत. मात्र याचे कसलेच भान एचपीएम कंपनीला राहिलेले नाही. कित्येकदा आंदोलने झाली तरीही एचपीएम ची मग्रुरी कायम आहे. नालीसह रस्त्याचे काम अतिशय बोगस होत असल्याच्या तक्रारी असून अवघ्या एका महिन्याच्या आत नालीवरील स्लॅब कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. काम झाले तर वेळेवर पाणी मारल्या जात नसल्याने एवढा खर्च होऊनही काम निकृष्ट दर्जाचे राहत आहे.
यात आणखी भर म्हणून की काय, कानडी कॉर्नर ते मंगळवार पेठ कॉर्नर पर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर एका बाजूने खोदून पहिला थर टाकण्यात आलेला आहे. मात्र पहिला थर टाकल्यानंतर दोन महिने काम बंद राहिले. त्यादरम्यान सदरील रस्त्यावरून वाहनांची ये जा झाल्याने सदरील रस्ता पूर्ण उखडला असून खडी मोकळी झाली आहे. त्यामुळे अगोदर त्याची दुरुस्ती करून दुसरा थर टाकणे गरजेचे आहे. मात्र दोन महिन्यानंतर सुरू झालेल्या कामात रेस्ट हाऊस तसेच पोलीस ठाण्या समोर दुसरा थर टाकून झाले असून आता त्या उखडलेल्या रस्त्यावरही दुसरा थर टाकण्याचा प्रयत्न एचपीएम च्या वतीने करण्यात येण्याची शक्यता आहे. मात्र तसे जर झाले तर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अतिशय निकृष्ट दर्जाचे काम होणार असून रस्ता कांही दिवसांतच खचण्याची शक्यता आहे. त्यामुळे अगोदर उखडलेला रस्ता दुरुस्त करा आणि नंतरच दुसरा थर टाका अशी मागणी होत आहे.