केज दि.२५ – केज तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत जात आहेत. पिसेगाव सीसीसी येथे बेड कमी पडत असल्याने शारदा इंग्लिश स्कूल मध्ये दुसरे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले. मात्र सकाळचे जेवण दुपारी तीन वाजेपर्यंत ही मिळत नसल्याने सदरील प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मुळूक व केज तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा करत यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला असून दिरंगाई कोण करतंय ? हे समोर आणले आहे.
रुग्णांना वेळेवर जेवण मिळत नसल्याच्या तक्रारीवरून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी रत्नाकर शिंदे यांच्यासह मागच्या आठ दिवसांपूर्वी शारदा कोविड सेंटर ला भेट देऊन वेळेवर जेवण देण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी ठेकेदार सोनी यांनी सुधारणा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दि.२५ रोजी जेंव्हा परिस्थिती पाहिली तेंव्हाही जेवण वेळेवर मिळत नसल्याची तक्रार होतीच. त्यामुळे रत्नाकर शिंदे यांनी ठेकेदार व रुग्णालयाचे वितरक यांना समोरासमोर उभे करून कारण विचारले असता, आम्ही वेळेवर जेवण बनवतो मात्र वितरण करणारे दिरंगाई करतात असे सांगितले.तर वितरण करणाऱ्याने आमच्याकडून दिरंगाई होत नसल्याचे स्पष्ट केले.
त्यामुळे रत्नाकर शिंदे यांनी चूक कोणाचीही असो यापुढे वेळेवर जेवण मिळाले पाहिजे अन्यथा शिवसेना स्टाईलने व्यवस्था करू असा इशारा दिला आहे. त्यामुळे आरोप प्रत्यारोप होत असले तरी किमान यापुढे तरी रुग्णांना वेळेवर चहा, नाष्ठा आणि जेवण मिळणार का ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.