परभणी दि.२५ – मन खंबीर आणि पहिल्यापासून शारीरिक काम करण्याची सवय असेल तर कितीही मोठ्या संकटाला परतवून लावण्याची ताकत माणसात येते. मात्र त्यासाठी लागते दुर्दम्य इच्छा शक्ती.आणि याच सकारात्मक मानसिकतेतून प्लेग महामारीचाही धीराने सामना करणाऱ्या तब्बल एकशे पाच वर्षांपेक्षा अधिक वयाच्या श्रीमती सरस्वतीबाई आबासाहेब देशमुख या आजीबाईंनी कोरोना विषाणूलाही धूळ चारत स्वतः ला पूर्वपदावर आणले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात मानव जातीवर कोरोनाचे मोठे संकट कोसळले आहे. कित्येकजण केवळ उपचार मिळत नाही म्हणून जीव गमावत आहेत.तर कित्येकांना बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर मिळणे कठीण झाले आहे. आणि यातूनच त्यांची मानसिकता ढासळून प्राण सोडत आहेत. यामध्ये अगदी तरुण वयातील नागरिक सुद्धा बळी पडत आहेत. मात्र सरस्वतीबाई या आजीबाईंनी शंभरी पार केलेली असतानाही कोरोनावर विजय मिळवला आहे आणि तो केवळ दुर्दम्य ईच्छा शक्तीवर.
मागच्या कांही वर्षांपूर्वी प्लेग नावाचे असेच एक संकट मानव जातीवर कोसळले होते. त्यामध्ये आजीबाईंच्या गावातील कित्येकांना आपले प्राण गमवावे लागले होते. मात्र तेवढ्या संकटातही आज्जीबाई संपूर्ण कुटुंबासह शेतात एका झोपडीत राहून सुरक्षित राहिल्या त्याच्या आठवणी त्या आजही सांगतात.
अतिशय कणखर आणि बोलक्या स्वभावाच्या सरस्वती आज्जी यांची आजही घरकाम करण्यासाठी धडपड सुरू असते. परंतु मुलगा व सुनेच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना देखील कोरोनाची लागण झाली. मात्र त्यांनी या आजाराला न घाबरता धीराने याचा सामना करत अवघ्या कांही दिवसांतच कोरोनाला धुडकावून लावले. जिथे धडधाकट माणसे घाबरून कोरोनाला बळी पडतात तिथे या आज्जीने केवळ दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनाला पळवून लावत समाजात एक आदर्श निर्माण केला आहे.
दरम्यान हिंगोली जिल्ह्यातील हट्टा या गावचे (ह.मु. परभणी) तथा केज तालुक्यातील मस्साजोग येथील गोकुळराव देशमुख यांचे जावई उध्दव देशमुख यांच्या त्या मातोश्री. उद्धव हे सध्या परभणी जिल्हा रुग्णालयात रक्तपेढी मध्ये कार्यरत आहेत.