Site icon सक्रिय न्यूज

केवळ 10 ते 15 टक्के कोरोना रुग्णांनाच ऑक्सिजन, रेमडीसीवीर ची गरज……!

केवळ 10 ते 15 टक्के कोरोना रुग्णांनाच ऑक्सिजन, रेमडीसीवीर ची गरज……!

नवी दिल्ली दि.२५ – कोरोनाचा कहर व त्यात ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा यामुळे देशाची चिंता वाढली असताना एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदिप गुलेरिया यांनी दिलासादायी दावा केला आहे. कोरोना हा सामान्य आजार आहे. लोकांनी घाबरून जाऊ नये. कोरोनाच्या केवळ 10 ते 15 टक्के रुग्णांनाच ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज आहे, तर 5 टक्के रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज आहे. 85 टक्के लोकांना सामान्य लक्षणे असून ते घरगुती उपाय किंवा योगा करून घरातच सात ते दहा दिवसांनी बरे होऊ शकतात, असे गुलेरिया यांनी म्हटले आहे.

देशातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर आज तज्ज्ञ डॉक्टरांची वेबिनारच्या माध्यमातून चर्चा झाली. या चर्चासत्रात ‘मेदांता’चे चेअरमन डॉ. नरेश त्रेहान, ‘एम्स’च्या मेडिसिन विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. नवीत विग आणि आरोग्य सेवेचे महासंचालक डॉ. सुनील कुमार यांनी सहभाग घेतला होता. या वेळी डॉ. गुलेरिया यांच्यासह अन्य तज्ज्ञांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय सुचवले. त्याचबरोबर कोरोना झाला म्हणून घाबरून जाऊ नका, असे आवाहन केले. तसेच देशातील ऑक्सिजनचा प्रश्न पुढील 5 ते 7 दिवसांत सुटेल, अशी आशा ‘मेदांता’चे चेअरमन डॉ. त्रेहान यांनी व्यक्त केली.

देशात सध्या भितीचे वातावरण आहे. त्यामुळे अनेक लोक त्यांना रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनची गरज नसतानाही घरामध्ये रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन सिलिंडर्स ठेवू लागले आहेत. त्यामुळे रुग्णालयात दाखल असलेल्या व गंभीर स्थिती बनलेल्या रुग्णांना ऑक्सिजन किंवा रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नाही, असे डॉ. गुलेरिया यांनी सांगितले. कोरोनाचा संसर्ग सामान्य संसर्ग आहे. जवळपास 85 ते 90 टक्के रुग्णांमध्ये ताप, खोकला, अंगदुखी, सर्दी अशी किरकोळ लक्षणे आहेत. या रुग्णांना ऑक्सिजन, रेमडेसिवीरची गरज नाही. अशा लोकांनी घरात रेमडेसिवीर, ऑक्सिजन ठेवू नये, असे डॉ. गुलेरिया यांनी सुचवले आहे.

दरम्यान रेमडेसिवीर ही काही जादूची गोळी नाही. जे रुग्ण रुग्णालयात उपचार घेताहेत, ज्यांची प्रकृती गंभीर आहे, अशाच रुग्णांना रेमडेसिवीर द्यायला हवे, अन्यथा रेमडेसिवीरचा फायदा होण्याऐवजी नुकसान होईल. त्यामुळे रेमडेसिवीरचा गरज नसताना वापर करू नका, असा सावधगिरीचा सल्ला डॉ. गुलेरिया यांनी दिला आहे.

शेअर करा
Exit mobile version