जालना दि.२६ – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असलेली पाहायला मिळत आहे. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. यापेक्षा भयंकर म्हणजे काहीजण या काळातही गिधाडांपेक्षा भयानक वागत आहेत. जालना जिल्ह्यातील एका वॉर्डबॉयने मृताच्या टाळूवरील लोणी खाल्ल्याप्रमाणे कोरोनाने मृत्यु झालेल्या रुग्णासोबत केलं आहे.
जालन्यामधील एका शासकीय कोविड रूग्णालयात ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. वॉर्ड बॉयने मयत कोरोनाबाधित रुग्णाच्या बोटाचा ठसा वापरुन ‘फोन पे’ ऍपच्या माध्यमातून त्याच्या खात्यातील पैसे आपल्या खात्यात जमा केले आहेत. पोलिसांनी आरोपी वॉर्डबॉयला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याआधी त्याने अशा प्रकारचं कृत्य केलं आहे का याची चौकशी पोलीस करत आहेत.
कचरु पिंपराळे असं मृत कोरोनाबाधित रूग्णाचं नाव आहे. काही दिवसांपुर्वी कचरू यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्याला जालन्यातीस शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. पिंपराळे यांचा मृत्यू झाल्यानंतर काही तासांनी त्यांच्या खात्यातून काही पैसे ट्रान्सफर झाल्याचं कुटुंबीयांच्या लक्षात आलं. बँक स्टेटमेंट आणि मोबाईल डिटेल चेक केल्यावर कचरु पिंपराळे यांच्या मोबाईलमधून अंगठ्याचा ठसा वापरुन फोनपे द्वारे 6 हजार 800 रुपये ट्रान्सफर केल्याचं घरच्यांच्या लक्षात आलं.
दरम्यान, कचरु यांचा मृत्यू पहाटे सहा वाजता झाला होता. त्यामुळे दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या खात्यातून पैसे कसे ट्रान्सफर झाले. हा प्रश्न कुटुंबीयांना पडला त्यानंतर त्यांना कळलं की पिंपराळे यांचा मोबाईल रुग्णालयातच राहिला होता.