मुंबई दि.२८ – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. महाराष्ट्रातही कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत चालली आहे. वाढत्या कोरोना रूग्णसंख्येमुळे राज्य सरकारने कडक लॉकडाऊन लावला. 1 मे सकाळी 7 वाजेपर्यंत हा लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. मात्र हा लॉकडाऊन आता वाढवण्यात आला आहे.कोरोनाची परिस्थिती पाहता हा लॉकडाऊन आणखी वाढवण्यात आला आहे. आजच्या कॅबिनेट बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मात्र याची अधिकृत घोषणा 30 एप्रिल ला घेण्यात येणार आहे.
15 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात 15 मे पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहणार आहेत. या निर्णयाची घोषणा 30 एप्रिल रोजी केली जाणार आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता वर्तवली होती. राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाईल, असं विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने 18 ते 44 या वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची घोषणा केली.