नंदुरबार दि.२८ – कोरोना काळात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासत आहे. मात्र रुग्णालयांमध्ये वाया जाणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाणही अधिक आहे. रुग्णालयातील वाया जाणारा प्राणवायू वाचवण्यासाठी नंदुरबार जिल्हा रूग्णालयात ‘ऑक्सिजन सिस्टर’ ही संकल्पना राबविली जात आहे. हीच संकल्पना राज्यभर राबविण्याची घोषणा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. ऑक्सिजन सिस्टर ही योजना नेमकी काय आहे याबाबत सविस्तर माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.
कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजनवर असलेले रुग्ण जेवण करताना किंवा टॉयलेट बाथरूमला जाताना त्यांच्या बेडवरील ऑक्सिजन फ्लो तसाच सुरू राहतो. त्यामुळे आक्सिजन वाया जात असतो. तसेच काही रुग्णांची ऑक्सिजन लेव्हल चांगली असेल तर ऑक्सिजनचे प्रमाण कमी केलं तर वाया जाणारा ऑक्सिजन वाचवता येतो. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात 50 बेडच्या मागे एक ऑक्सिजन सिस्टर नेमण्यात आली आहे. ती फक्त या रुग्णांच्या ऑक्सिजनची पाहणी करत असते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनला सर्वाधित महत्त्व आले आहे. त्यामुळे रुग्णालयात वाया जाणारा ऑक्सिजन वाचविण्यासाठी ऑक्सिजन सिस्टर ही संकल्पना राबविण्यात येत आहे. जिल्हा रुग्णालयात असलेल्या 150 ऑक्सिजन बेडसाठी 3 नर्स या ऑक्सिजन सिस्टरचे काम करतात. त्या ऑक्सिजन लावलेल्या रुग्णांवर लक्ष ठेऊन राहतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची बचत होत असते.
दरम्यान ऑक्सिजन सिस्टर हा प्रयोग चांगला असून यातून मोठ्या प्रमणात ऑक्सिजनची बचत होते. त्यामुळे संपूर्ण राज्यात ही संकल्पना राबविली जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. देश आणि राज्य ऑक्सिजन संकटातून जात आहे. आरोपॉ-प्रत्यारोप करण्यापेक्षा ऑक्सिजनची कशी बचत करता येईल हे सांगणारा नंदुरबारच्या जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन सिस्टर ही संकल्पना सर्वांना मार्गदर्शक ठरत आहे.