Site icon सक्रिय न्यूज

महाराष्ट्र दिन साधेपणाने होणार साजरा.…….! 

महाराष्ट्र दिन साधेपणाने होणार साजरा.…….! 

मुंबई दि.२९ – कोरोनाबाधितांची वाढती रुग्णसंख्या विचारात घेऊन कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी आणि विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन जोरदार काम करत आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने 13 एप्रिलपासून 1 मेच्या सकाळी 7 वाजेपर्यंत राज्यात संचारबंदीसह कडक निर्बंध लागू केले आहेत. आता हे कडक निर्बंध वाढवण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला आहे. त्यातच आता राज्याचा उत्सव म्हणजेच महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 61 वा वर्धापन दिन, यावर देखील कोरोनाचा प्रभाव दिसून येत आहे.

कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठीच्या तरतुदी विचारात घेऊन राज्यात यंदा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 61 वा वर्धापन दिन समारंभ गतवर्षी प्रमाणेच अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात यावा, अशा सूचना सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार शाखेमार्फत आज पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे मागिल वर्षाप्रमाणे या वर्षी देखील महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा केला जाणार आहे.

आपत्ती व्यवस्थापन विभागाने कोरोनाच्या अनुषंगाने दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावं. सर्वांसाठी मास्क बंधनकारक राहील, याची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.  त्यानुसार जिल्हा मुख्यालयात केवळ एकाच ठिकाणी सकाळी 8 वाजता फक्त ध्वजारोहण करण्यात यावं. विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी विभागीय आयुक्त पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक व अमरावती यांनी ध्वजारोहण समारंभाकरीता योग्य ती व्यवस्था करावी, अशा सुचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वजारोहणाचा वेगळा कार्यक्रम आयोजित करु नये. इतर सर्व जिल्ह्यात केवळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात यावं, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

शेअर करा
Exit mobile version