Site icon सक्रिय न्यूज

सध्याच्या काळात ‘पेनकिलर’ घेणे टाळाच……!

सध्याच्या काळात ‘पेनकिलर’ घेणे टाळाच……!

नवी दिल्ली दि.३० – अंग दुखतेय वा इतर कुठल्याही वेदना झाल्यास अनेकजण पेनकिलर गोळ्या घेतात. अनेकांना तर या गोळ्या घेण्याची सवयच लागलीय. पण या लोकांनी सध्याच्या कोरोनाच्या वाढत्या फैलावात पेनकिलर गोळ्या घेणे टाळले पाहिजे. पेनकिलर गोळ्यांमुळे कोरोनाची लक्षणे आणखी गंभीर बनतील आणि जिवीताला धोका निर्माण होईल, असा इशारा देत इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) याबाबत नागरिकांना खबरदारीचा सल्ला दिला आहे. शक्यतो सध्याच्या कोरोना काळात पेनकिलर गोळ्या घेणे टाळाच, असे आवाहन आयसीएमआरने केले आहे.

कोरोना संसर्ग झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पेनकिलर गोळ्या घेणे धोकादायक ठरू शकते. इबुप्रोफेन यांसारखी औषधे कोरोना संसर्गाचा धोका आणखीन वाढवत आहेत. नॉन स्टेरोडिकल अ‍ॅण्टी इन्फ्लामेंटरी औषधे घेणे तर कोरोना काळात अत्यंत हानीकरण ठरणारे आहे. तुम्ही डॉक्टरांच्याच सल्ल्यावरून ही औषधे घेऊ शकता. किडनी आणि ह्दयाशी संबंधित विविध विकार असलेल्या लोकांनी या सल्ल्याकडे विशेष गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आयसीएमआरने म्हटले आहे. कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतरही लगेचच पेनकिलर गोळ्या घेऊ नका. या गोळ्या लसीचा परिणाम निष्प्रभ करतील. लसीमुळे वाढणारी इम्युनिटी या गोळ्या घेतल्यास कमी होईल, असेही आयसीएमआरने नमूद केले आहे.

पेनकिलर अर्थात तात्पुरत्या वेदना कमी करणारी ही औषधे गंभीर आजाराला निमंत्रण देऊ शकतात. पेनकिलर गोळ्यांचे सेवन करणे हानिकारक आहे, असे मत याआधी आरोग्य क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ मंडळींनी मांडले आहे. तसेच अनेक संशोधनातूनही अशाच प्रकारचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. पेन किलर अर्थात वेदनाशामक गोळ्यांचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने आपल्या शरीराच्या अनेक भागांवर वाईट परिणाम होतात. हृदयविकाराचा झटका किंवा मूत्रपिंड-यकृत निकामी होण्याची समस्याही उद्भवू शकते, असे विविध संशोधनात आढळले आहे. बाजारात पेन किलरचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. ज्यात केवळ गोळ्या, इंजेक्शन्सच नाहीत तर क्रिम, सिरप इत्यादींचा समावेश आहे. पेन किलरचा जास्त वापर केल्याने तुमच्या मेंदूवरदेखील परिणाम होतो. ज्यामुळे मेंदूशी संबंधित अनेक आजारांचा धोका होण्याची शक्यता असते, असाही निष्कर्ष विविध संशोधनात काढण्यात आला आहे.

शेअर करा
Exit mobile version