Site icon सक्रिय न्यूज

केज तालुक्यात संसर्ग वाढला मात्र मृत्यू दरात दिलासादायक घट……..!

केज तालुक्यात संसर्ग वाढला मात्र मृत्यू दरात दिलासादायक घट……..!
केज दि.३० –  महाराष्ट्रात कोरोनाचे आकडे दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. सर्वत्र दवाखाने फुल झाल्याने बेड मिळणे कठीण झाले आहे. काहींना तर उपचाराभवी जीव गमवावा लागत आहे. तर कांहीजण अंगावरच दुखणे काढून जीव धोक्यात घालत आहेत. मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. मात्र केज तालुक्यासाठी दिलासादायक गोष्ट म्हणजे तालुक्यात संसर्गाचे प्रमाण जरी वाढले असले तरी मागच्या दोन महिन्यात मृत्यूच्या दरात मोठी घट झाल्याचे दिलासादायक चित्र आहे.
           कोरोनाच्या पहिल्या लाटेत सर्वत्र कोरोना रुग्ण वाढत असताना बीड जिल्ह्याने कित्येक महिने संसर्गाला वेशीवर अडवून ठेवले होते. मात्र दुर्दैवाने जिल्ह्यात शिरकाव झालाच. मात्र त्यानंतरही केज तालुक्याने खिंड लढवत कोरोना संसर्ग बरेच दिवस रोखून धरला होता. मात्र शेवटी 20 मे 2020 रोजी पहिला रुग्ण आढळून आला. तिथून सुरुवात झाल्यानंतर संसर्गही वाढला अन मृत्यू दरही वाढला. एकवेळ तर अशी आली होती की जिल्ह्यात केजचा मृत्युदर सर्वाधिक झाला होता. यामध्ये फेब्रुवारी 2021 पर्यंत तालुक्यात रुग्ण होते 1271 अन मृत्युदर होता 4.33 त्यामुळे कमालीची चिंता वाढली होती.
             दरम्यान मार्च आणि एप्रिल 2021 या दोन महिन्यात रुग्णांची संख्या 3212 झाली. मात्र रुग्ण जरी मोठ्या प्रमाणावर वाढले असले तरी मृत्यू दर मात्र 0.81 वर खाली आला होता. सध्या केज तालुक्यात 4483 ऍक्टिव्ह रुग्ण असून मृत्युदर 1.81 एवढा आहे. त्यामुळे तालुक्याचा मृत्युदर सुमारे तीन टक्क्यांनी कमी झाला असून आतापर्यंत तालुक्यात 81 मृत्यूची नोंद झालेली आहे. मृत्यू दरात लक्षणीय झालेली घट जरी दिलासादायक असली तरी तालुक्यातील नागरिकांनी कोरोना विषयक नियमांचे तंतोतंत पालन करून संसर्गाचे प्रमाण कमी करण्याची गरज असल्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास आठवले यांनी केले आहे.
                आज (दि.३०) रोजी प्राप्त झालेल्या 4717 अहवालात बीड जिल्ह्यात 1520 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले असून केज तालुक्यातील 198 रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये शहरात 32 तर ग्रामीण भागातील केकत सारणी या गावातील रुग्णांची संख्या मोठी आहे.
शेअर करा
Exit mobile version