केज दि.३० – केज तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. प्रशासनाच्या वतीने वारंवार आवाहन करूनही वेगवेगळ्या कारणांमुळे लोक मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत. मात्र याला पायबंद घालण्यासाठी आता सक्त निर्णय घेतल्या जात असून विनाकारण बाहेर येणाऱ्या लोकांची दिसेल तिथे कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे. यामध्ये जे पॉजिटिव्ह निघतील त्यांना दवाखान्यात पाठवण्यात येणार असून जे निगेटिव्ह येतील त्यांच्याकडून मोठा दंड वसूल करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार दुलाजी मेंडके यांनी दिली.
कोरोना विषयक नियमांचे पालन व्हावे यासाठी शनिवारी आणि रविवारी विकेंड लॉक डाउन असणार आहे. यामध्ये मेडिकल व दवाखाने वगळता एकाही दुकानाला उघडण्याची परवानगी नाही. जे दुकानदार नियमांचा भंग करतील त्यांच्यावर पोलीस, महसूल तसेच नगरपंचायत च्या गुप्त पथकांची करडी नजर असणार आहे. त्यामध्ये कुणी नियम भंग केला तर गुन्हा नोंद करणे, दुकान सील करून लायसन जप्त करणे अशी कारवाई होणार आहे.
तर जे नागरिक विनाकारण बाहेर फिरतील त्यांची कोरोना टेस्ट करण्यासाठी एका पथकाची नेमणूक करण्यात आली असून थेट कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती श्री. मेंडके यांनी दिली असल्याने आता मात्र मोकाट फिरणाऱ्यांची खैर नाही. मात्र उद्या व परवा सायंकाळी 5 ते 7 या वेळेत फळ विक्रेत्यांना केवळ गल्ली मध्ये फिरून फळ विक्री करण्यासाठी परवानगी असेल.