नवी दिल्ली दि.२ – देशातील कोरोनाची परिस्थिती ही दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात ताण येत असून परिणामी आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याचं गंभीर चित्र दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर अमेरिकेतील प्रमुख वैद्यकीय सल्लागार डॉक्टर अँथोनी फाऊची यांनी भारताला महत्वाचा सल्ला दिला आहे.
फाऊची यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत भारतामध्ये वाढत असलेल्या कोरोनाबद्दल मोठं वक्तव्य करत देशात काही आठवड्यांचा लॉकडाऊन गरजेचा असल्याचं बोलून दाखवलं. लाॅकडाऊन हा कुणालाही आवडणारा नाही, पण कोरोनाचा लढा जिंकण्यासाठी हा प्रभावी उपाय असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनात प्रमुख वैद्यकीय सल्लागार म्हणून डॉ. अँथोनी फाऊची कार्यरत आहेत. भारतात काही महिन्यांच्या लॉकडाऊनची गरज नाही, पण तात्पुरत्या स्वरूपात काही आठवड्यांचा कडक लॉकडाऊन गरजेचा आहे, असं त्यांनी भारताला सुचवलं आहे.
दरम्यान देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. उपचाराअभावी आणि रुग्णाला ऑक्सिजन बेड किंवा व्हेंटिलेटर न मिळाल्यामुळे नाहक बळी जात आहे. त्याचबरोबर, देशामध्ये औषधांचाही तुटवडा निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर भारतात केवळ दोन टक्के लोकांनाच लसीकरण करण्यात आले आहे. ही अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर गोष्ट आहे, असंही डॉ. अँथोनी यांनी यावेळी बोलून दाखवलं.