गेवराई दि.३ – दिनांक 01-05-2021 रोजी पोलीस ठाणे तलवाडा हद्दीमधील राजापूर शिवारात ज्ञानेश्वर तुकाराम चव्हाण वय 35 वर्ष व्यवसाय मजुरी रा. गोळेगाव तालुका गेवराई जिल्हा बीड यांचे प्रेत नाकातून रक्त येत असलेल्या व गळ्यावर मारल्याचे निशाण असलेल्या अवस्थेत आढळून आला होता. मात्र सदर प्रकरणी पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवत मयताची पहिली पत्नी व तिच्या प्रियकराला ताब्यात घेत गुन्ह्याची उकल केली आहे.
सदरील घटना उघड झाल्यानंतर पोलिसांनी दोन शासकिय पंचासमक्ष सदर प्रेताचा पंचनामा करून प्रेत सरकारी दवाखाना तलावडा येथे पीएम करण्यासाठी नेण्यात आले होते.तर सदर प्रकरणात पोलीस स्टेशन तलवाडा येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र त्यानंतर सदर मयता बाबत त्याचे नातेवाईक यांच्या फिर्यादीवरून 302 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर प्रकरणात पोलिसांनी तपासाच्या अनुषंगाने जलद गतीने सूत्र हलवून गोपनीय माहितीदाराकडून माहिती काढून, सदर मयत इसमास गोसावी वस्ती वरील नाना आप्पा शिंदे याने व मयताची पहिली पत्नी छाया ज्ञानेश्वर चव्हाण यांनी त्यांच्यात असलेल्या प्रेम संबंधा करिता अडथळा येत असल्याने यांनी कट रचून यातील मयत यास आरोपी नाना आप्पा शिंदे याने बोलावून दारू पाजुन राजापूर शिवारात रघुनाथ खेडकर यांच्या शेतात दोरीने गळा आवळून खून केला असे निष्पन्न झाल्याने दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याची उकल वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्री. नवघरे, पोलीस नाईक वडकर, पोलीस नाईक खाडे यांनी केली.