नवी दिल्ली दि.३ – कोरोना व्हायरसचं आरटी-पीसीआर टेस्टमध्येही निदान न झाल्याची काही प्रकरणं दिसून येेत आहेत. मात्र सिटी स्कॅनमध्ये अशा रुग्णांना कोरोना असल्याचं निदान होत आहे. त्यानंतर अनेक जण सीटी स्कॅन करून घेत आहेत. पण सिटी स्कॅन करणं महागात पडू शकतं, असा इशारा एम्सच्या डॉक्टरांनी दिला आहे.
कोरोनाच्या सौम्य लक्षणांमध्ये CT-SCAN करू नका. सिटी स्कॅन विचारपूर्वक करायला हवं, असं एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं आहे. ते सोमवारी आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी सौम्य लक्षणं असलेले रुग्ण कोणत्याही औषधांशिवाय बरे होऊ शकतात, असं ते म्हणाले.
दरम्यान सीटी स्कॅन हे तीनशे छातीच्या एक्स-रेच्या समतुल्य आहे. हे अत्यंत हानिकारक आहे. घरातील विलगीकरणात राहणारे लोक त्यांच्या डॉक्टरांशी संपर्क साधत असतात. ऑक्सिजन सॅच्युरेशन 93 किंवा त्याहून कमी होत आहे, अशक्तपणासारखी परिस्थिती आहे. आपल्या छातीत दुखत असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा, असंही रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं आहे.