बीड दि.३ – पेठ बीड भागातील बेकायदेशीर औषधी साठ्यावर पोलीस अधीक्षक आर. राजा यांच्या विशेष पथकाने शुक्रवारी रात्री पेठ बीड हद्दीत छापा टाकला. यावेळी वेगवेगळ्या १५ प्रकारची औषधी जप्त करण्यात आली असून एका आरोपीला ताब्यात घेत गुन्हा नोंद करण्यात आला. कोरोना बाधितांवर उपचारासाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा सगळीकडेच तुटवडा आहे. त्यामुळे बनाववट रेमडेसिवीर इंजेक्शन बनवण्यासाठी ही औषधी गोळा केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
शेख अखतर शेख रशीद (३०, राग़ांधीनगर, बीड) असे संशयित आरोपीचे नाव आहे. घरापासून जवळच अचानकनगरात त्याची जुनी शेडवजा खोली आहे. तेथेे शेख अखतर याने मोठ्या प्रमाणात औषधी साठा केल्याची माहिती पोलीस अधीक्षक आर. राजा यांच्या पथकाचे प्रमुख सहायक निरीक्षक विलास हजारे यांना मिळाली होती. त्यानुसार हजारे यांनी सहकाऱ्यांना सोबत घेत ३० एप्रिल रोजी रात्री शेख अखतर यास ताब्यात घेतले व अचानकनगरातील त्याच्या खोलीची झाडाझडती घेतली. यावेळी वेगवेगळ्या १५ प्रकारची औषधी आढळून आली. ही औषधी त्याने बेकायदेशीररीत्या स्वत:च्या ताब्यात ठेवली होती. त्यामुळे औषध प्रशासन विभागाला पत्र देऊन कारवाईबाबत मार्गदर्शन मागविले होते. त्यानुसार औषध निरीक्षक रामेश्वर डोईफोडे यांच्या फिर्यादीवरुन शनिवारी (दि.१) कलम १८८, औषध व सौंदर्य प्रशासन अधिनियम १९४०, जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ कलम ३ अन्वये पेठ बीड ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. शेख अखतर यास पुन्हा ताब्यात घेऊन रविवारी (दि.२) न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली, अशी माहिती उपनिरीक्षक सुबोध जमदाडे यांनी दिली.
कोव्हॅक्सीन लसीसह १५ प्रकारची औषधी विशेष पथकाने शेख अखतर याच्या खोलीतून १५ प्रकारची औषधी जप्त केली. यात पेंटोप्रोझोल पेंटोझोनच्या ३० बाटल्या, सेफोपॅरालोनच्या १२ बाटल्या,पायपरॅसिलीन अँड टॅलोबामच्या सात बाटल्या, सेफ्यूरिक्झाईमच्या ९ बाटल्या, मेरॉपेनेमच्या दोन बाटल्या, कोव्हॅक्सीन (कोरोना लस) एक बाटली तेथे आढळून आली. पेन्टॉकुल व सेटॉलॅक्झीम सोडियम, झिप्रेड व एक्यूरिबची प्रत्येकी एक बाटली, पॅथोझिमच्या सहा बाटल्या, युरिया यूव्हीच्या चार बाटल्या, यरिया स्टेडची एक बाटली व बीसी व्हॅक्सीनची एक बाटली हस्तगत करण्यात आली. विशेष म्हणजे यातील सहा औषधी ही शासकीय पुरवठ्याची आहेत. ती शेख अखतरकडे कोठून आली, याचे कोडे उलगडण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.