केज दि.४ – तालुक्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केज महसूल, पोलीस आणि नगरपंचायत प्रशासन चांगलेच ऍक्शन मोडमध्ये आलेले दिसत आहे. मागच्या चार दिवसांपासून मोकाट फिरणाऱ्यांची अँटीजन टेस्ट करण्यात येत असल्याने बऱ्यापैकी वर्दळ कमी झाली आहे. तर आज भरणारा आठवडी बाजार बसण्या अगोदरच प्रतिबंध केल्याने पंचायत समिती मैदानावर शुकशुकाट दिसून आला.
राज्यात कोरोना संसर्गामुळे कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र याचे गांभीर्य नसलेले लोक विनाकारण बाहेर फिरून संसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरत आहेत. दररोज सरासरी दिडशेच्या प्रमाणात तालुक्यात रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य विभागावर ताण वाढत चालला आहे. शहरातील तिन्हीही कोविड सेंटर क्षमतेपेक्षा जास्त भरले आहेत. तरीही लोकांमध्ये कांहीच गांभीर्य दिसत नसल्याने मागच्या चार दिवसांपासून मोकाट फिरणाऱ्या लोकांची अँटीजन टेस्ट करण्याची मोहीम सुरू केल्याने सुपर स्प्रेडर सापडत आहेत.
तसेच आठवडी बाजारावर बंदी असतानाही ग्रामीण भागातील लोक मोठ्या प्रमाणावर भाजीपाला घेऊन शहरात येत असल्याने पंचायत समितीच्या मैदानावर मोठी गर्दी होत होती. मात्र आज सकाळीच यावर प्रतिबंध घालण्यासाठी स्वतः तहसीलदार दुलाजी मेंडके, पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्यासह नगर पंचायत चे असद खतीब, अमर हजारे,सय्यद अतिक, श्री.हाजबे, पोटे, धम्मापाल मस्के,आयुब पठाण,अशोक मस्के,आझाद शेख यांनी शहरात चारी बाजूने नाकाबंदी करून भाजीपाला विक्रेत्यांना येण्यास मज्जाव केला. आणि जे कांही थोडेफार आले होते त्यांनाही एकत्र बसू न दिल्याने आज बाजार भरला नाही. तसेच शहरात ज्या दुकानांना उघडण्यास बंदी आहे त्यांच्यावर नजर ठेवून दंड ठोठावल्याने इतर दुकानदारांनी शटर बंद करून काढता पाय घेतला.
दरम्यान शहरातील भवानी चौकात आजही अँटीजन टेस्ट मोहीम राबविण्यात येत असून मोकटांची वर्दळ कमी झाली आहे.
ग्रामीण भागातही अँटीजन टेस्ट मोहीम राबवण्यात येणार – दुलाजी मेंडके
शहरात मागच्या चार दिवसांपासून अँटी जन टेस्ट मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामुळे अनेक कोरोना बाधित सुपर स्प्रेडर लोक सापडत आहेत. सदरील मोहिमेमुळे शहरात संसर्गाचा धोका कमी होत चालला आहे. सध्या तालुक्यात सर्वात जास्त रुग्ण हे ग्रामीण भागात आढळून येत आहेत. त्यामुळे अँटी जन टेस्ट मोहीम ग्रामीण भागातही गावोगावी राबविण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार दुलाजी मेंडके यांनी दिली.