केज दि.५ – मागच्या दोन दिवसांपासून केज उपजिल्हा रुग्णालयात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. रजिस्ट्रेशन आणि शेड्युल्ड ची प्रक्रिया पूर्ण करून लसीकरण होत असल्याने अतिशय नियोजबद्ध उपक्रम सुरू असून यापुढेही या वयोगटातील नागरिकांनी स्वतः रजिस्ट्रेशन व शेड्युल्ड ची प्रक्रिया पूर्ण करूनच लसीकरणास येण्याचे आवाहन प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. बालासाहेब सोळंके यांनी केले आहे.
मंगळवार दि.४ पासून केजच्या उपजिल्हा रुग्णालयात प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.बालासाहेब सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात येत आहे. यामध्ये ज्यांनी रजिस्ट्रेशन व शेड्युल्ड पूर्ण करून बुकिंग केलेली आहे अश्या लोकांना लस देण्यात येत आहे. यासाठी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी लसीचा डोस देऊन लाभार्थ्यांना तिथेच अर्धा तास निरीक्षणाखाली ठेवून काळजी घेत आहेत. त्यामुळे लसीकरण करून घेण्याची जी पूर्वी लोकांच्या मनात भीती होती ती आता मात्र दिसून येत नाही. लोक स्वयंस्फूर्तीने लसीकरणासाठी येत आहेत. सदरील ठिकाणी वैद्यकीय अधीक्षक डॉ.बालासाहेब सोळंके, डॉ.केशव इंगोले, श्रीकृष्ण नागरगोजे, शिवकांता गवळी, निर्मला घुंबरे, त्रिशाला कराड यांच्यासह सोनी जवळा येथील विवेकानंद विद्यालयाचे शिक्षक परिश्रम घेत आहेत.
दरम्यान सदारील उपजिल्हा रुग्णालयात सध्या लसीकरण, 25 बेडचे डिसीएचसी सुरू आहे. तर इतर रुग्णांचा लोंढाही मोठ्या प्रमाणावर आहे असून कोरोनाचे 23 रुग्णही सध्या तिथे उपचार घेत आहेत. मात्र सदरील दवाखान्यातील सुमारे 9 तज्ज्ञ डॉक्टर्स प्रतिनियुक्तीवर आहेत. तर दोघे रजेवर असल्याने या सर्व बाबींचा ताण अपुऱ्या स्टाफ वर येत असूनही कसल्याही प्रकारची कुचराई न करता उपलब्ध आरोग्य कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र प्रतिनियुक्तीवर गेलेले हक्काचे डॉक्टर्स परत आणण्यासाठी कुणीही म्हणावे तसे प्रयत्न करताना दिसत नाही. त्यामुळे मुद्दाम अणायचेच नाहीत की काय? अशी शंका निर्माण होत आहे.