बीड दि.५ – मागच्या चार दिवसांपूर्वी पिट्टिघाट (ता.केज) येथील रोजंदारी करुन उदरनिर्वाह चालवणाऱ्या गिताबाई जगन्नाथ ठोंबरे या ४८ वर्षीय महिलेचा शेतात कापुस वेचत असताना अंगावर वीज कोसळुन दुर्दैवी मृत्यू झालेल्या कुटुंबातील मुलीचे शैक्षणिक पालकत्व युवासेना केज तालुका प्रमुख अरविंद थोरात यांनी स्वीकारून अनाथ झालेल्या मुलीला खऱ्या अर्थाने आधार देण्याचे काम केले आहे.
आईचा वीज पडून मृत्यू झाला आणि वडीलही चार वर्षांपूर्वी वारलेले. घरातील एकुलती एक 15 वर्षाची अश्विनी नावाची मुलगी एका दिवसात अनाथ झाली. तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. अशी पोस्ट पत्रकार अमोल जाधव यांनी सोशेल मीडियावर टाकली होती.मात्र याची दखल कुणी राजकारणी अथवा तथाकथित सामाजिक संस्थेने घेतली नाही. परंतु सदरील पोस्ट केज तालुका युवासेना प्रमुख आणि सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या अरविंद थोरात या तरुणाने घेतली.
तसेच त्या मुलीची माहिती घेऊन अरविंद यांनी मित्रांशी चर्चा केली असता शिवसेना तालुकाप्रमुख रत्नाकर शिंदे, स्वर्गिय बाबु आण्णा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन चंदनशिव, मेजर गणेश लामतुरे, हनुमंत सत्वधर यांनीही त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सहकार्य केलं. या सर्वांच्या सहकार्याने भाऊ म्हणुन बारा हजार रुपयांचे अश्विनीकरीता पाच ड्रेस, मेडीसीन, मास्क, सॅनिटायजर, किराणा सामान व इतर जीवनावश्यक सर्व वस्तु घेतल्या. केज येथुन युवासेना अरविंद थोरात, युवासेना शहरप्रमुख तात्या रोडे, हनुमंत सत्वधर तसेच नांदुर येथुन पत्रकार अमोलज जाधव, मधुकर सांगळे, सोनु इंगळे या सर्वांनी पिट्टिघाट येथे जाऊन मुलीकडे त्या सर्व वस्तु सुपूर्द करुन तिला धीर दिला. तसेच अरविंद यांनी तिचं शैक्षणिक पालकत्व स्विकारत तिची पुढिल शिक्षणाची जबाबदारी घेतली.तर पत्रकार अमोल जाधव यांनी त्या मुलीला सर्व शासकीय मदत मिळवुन देण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान अश्या संवेदनशील घटना घडल्या नंतर वास्तविक पाहता लोकप्रतिनिधींनी तात्काळ पुढे येणे गरजेचे असते. मात्र केवळ निवडणुका आणि राजकारण एवढ्या पुरतेच आम्ही जनतेचे किती वाली आहोत हे दाखवणारे पुढारी गोरगरिबांना कसे वाऱ्यावर सोडतात हे वेगळं सांगण्याची गरज नाही.