Site icon सक्रिय न्यूज

लसीचा दुसरा डोस घेण्यास उशीर झाला तर…….?

लसीचा दुसरा डोस घेण्यास उशीर झाला तर…….?

परभणी दि.६ – महाराष्ट्रात सध्या कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे. लसीचा पहिला डोस तब्बल एक कोटींहून अधिक लोकांनी महाराष्ट्रात घेतला आहे. पण लसीचा दुसरा डोस तुटवड्याअभावी अनेक ठिकाणी मिळत नसल्याचं किंवा उशिर होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

पहिला लसीचा डोस घेतल्यानंतर दुसरा लसीचा डोस हा ठराविक वेळेत मिळाला नाही तर पहिला घेतलेला डोस हा वाया जातोय, अशा प्रकारचा संभ्रम सध्या नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे. यासंदर्भात, नागरिकांनी घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही, कारण उशिराने लस घेतल्यानंतरही कोरोनापासून आपण तेवढेच सुरक्षित होऊ शकतो, असं मत वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केलं आहे.

परभणी सह कांही जिल्ह्यात लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर अनेकांना ठराविक वेळेमध्ये दुसरा डोस मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कारण, जिल्ह्यात लसींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे. अशातच ठराविक वेळ निघून गेल्यामुळे लसीचा शरीरावर परिणाम होईल की नाही? असा प्रश्न नागरिकांना पडला होता.

दरम्यान परभणीतील माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. रावजी सोनवणे यांनी, “लसीचा पहिला डोस घेतल्याने बऱ्यापैकी अँटीबॉडीज तयार होतात. त्यामुळे, दुसरा डोस घेण्यास उशीर झाला तरी तो डोस घ्यायला हवा, उशीर झाला म्हणून लस घेणं टाळू नये”, असं मत व्यक्त केलं आहे. त्यामुळे दुसऱ्या डोसला उशीर जरी झाला तरी नागरिकांनी न घाबरता लसीचा दुसरा डोस घेणं गरजेचं असल्याचं स्पष्ट झालं आहे.

शेअर करा
Exit mobile version