Site icon सक्रिय न्यूज

‘या’ शहराची कोरोना मुक्तीकडे वाटचाल..…..! 

‘या’ शहराची कोरोना मुक्तीकडे वाटचाल..…..! 

बीड दि.७ – गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आरोग्य यंत्रणेसह प्रशासनावर मोठ्या प्रमाणात ताण येत असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या ही देशातील सर्वाधिक रुग्ण संख्या असल्याचं स्पष्ट झालं होतं.औरंगाबाद शहरामध्ये सलग दोन महिन्यापासून कोरोनाने अक्षरशः थैमान घातलं होतं. वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच आता शहरातून कोरोना संदर्भात सकारात्मक आणि दिलासादायक चित्र समोर येत आहे. औरंगाबाद शहरातील दररोज वाढणारी कोरोना रुग्णसंख्या हळूहळू कमी होत असल्याचं दिसून येत आहे.

31 मार्च रोजी औरंगाबादमध्ये 10 हजार 915 कोरोना रुग्ण रुग्णालयात उपचाराधीन होते. त्यानंतर, 5 मे रोजी ही संख्या 2 हजार 785 वर आली आहे. औरंगाबाद शहरातील बरे होणाऱ्यांची टक्केवारीही 94.52 वर आली आहे. त्यामुळे आता औरंगाबाद शहर कोरोनावर मात करण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दिलासादायक वातावरण पसरलं आहे.

दरम्यान मागच्या 36 दिवसांमध्ये औरंगाबाद शहरातील 10 हजारात असणारी रुग्णसंख्या ही अवघ्या 2 हजारांवर आल्याने हे शहर लवकरच कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने आगेकूच करत असल्याचं बोललं जात आहे. सध्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये उपचार घेणाऱ्या एकूण रुग्णांपैकी फक्त 30 टक्के रुग्ण हे शहरी भागातील आहेत. परंतु, चिंताजनक गोष्ट म्हणजे 70 टक्के रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे आता प्रशासनाला आणखी कठोर परिश्रम घेऊन कोरोनाशी दोन हात करण्याची गरज आहे. रुग्ण संख्येतील हीच घट कायम राहिली तर लवकरच औरंगाबाद शहर कोरोनामुक्त होईल.

शेअर करा
Exit mobile version