केज दि.७ – तालुक्यातील बन सारोळ्या सह दहा गावांसाठी वर्ग एक श्रेणीचा पशुवैद्यकीय दवाखाना आहे. ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणावर शेतकरी आपल्या पशुधनाच्या विलाजासाठी येथे येतात. परंतु सदरील गावात दवाखान्याची इमारत पूर्ण होऊन धूळखात पडली आहे तरी अद्याप हस्तांतरित झालेली नसून पशुधनावर उपचार करणे जिकिरीचे झाले आहे.
तालुक्यातील बनसारोळा हे मोठी लोकसंख्या असलेले गाव आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रासह जनावरांवर उपचार करण्यासाठी वर्ग एक चा पशुवैद्यकीय दवाखाना आहे. तिथे डॉक्टरसह एकूण तीन कर्मचारी कार्यरत आहेत. सदरील दवाखान्यांतर्गत इतर दहा गावांचा समावेश होत असून मोठ्या प्रमाणावर दुभत्या जनावरांसह इतरही जनावरांवर उपचार करण्यासाठी शेतकरी बन सारोळ्यात येत असतात. मात्र इमारत पुरेशी नसल्याने नवीन इमारतीचे काम झाले आहे. परंतु सदरील इमारत पूर्ण होऊन तीन चार महिने झाले तरी अद्याप ती हस्तांतरित करून कार्यान्वित करण्यात आलेली नाही.
इमारत असूनही कार्यान्वित झाली नसल्याने सध्या मंडलाधिकारी कार्यालयातील एका खोलीचा आसरा घेऊन जनावरांवर उपचार करावे लागत आहेत. मात्र सदरील प्रकरणी केजचे गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडे यांच्याशी दोन वेळेस विचारणा केली असता, माहिती घेऊन सांगतो म्हणून वेळ मारून नेली. त्यामुळे इमारतीचे कांही काम राहिले आहे का? कांही तांत्रिक अडचण आहे का ? इत्यादी प्रश्नांची उत्तरे मिळू शकली नाहीत.
दरम्यान लाखो रुपये खर्चून सुस्सज इमारत होऊनही केवळ हस्तांतरण होत नसल्याने पशुधनाच्या उपचारामध्ये अडचणी निर्माण होत असतील तर याला जबाबदार कोण ? असा प्रश्न निर्माण झाला असून तात्काळ इमारत हस्तांतरित करण्याची मागणी होत आहे.