केज दि.८ – सध्या सर्वत्र कोरोनाने हाहाःकार माजवला आहे. कोरोना विषयक नियमांची अंमलबजावणी करण्यात प्रशाशन मेटाकुटीला आलेले आहे. प्रमाणे, सक्तीने सांगूनही लोक ऐकायला तयार नाहीत. त्यामुळे वर्दळ वाढवण्यास कारणीभूत असलेल्या कांही सेवांवर बंधने आणली तर नक्कीच मदत होईल असा सूर बहुतांश लोकांचा आहे.
जिल्ह्यात सर्वत्र नाकाबंदी असतानाही हजारो दुचाकी, चारचाकी वाहने सर्वत्र धावताना दिसत आहेत.यामध्ये अत्यावश्यक सेवेतील कमी अन विनाकारण आणि साध्या साध्या कामासाठी फिरणाऱ्या लोकांचीच वाहने जास्त असतात. दुचाकी अन चारचाकी वाहनांना पेट्रोल पंपावर बिनदिक्कत इंधन मिळत असल्याने कुठेच अडत नाही. पेट्रोल पपं अत्यावश्यक सेवेत येत असल्याचा कारणाने ते उघडेच असतात. परंतु इंधन भरण्यासाठी येणाऱ्या वाहनांची नोंद ठेवली तर अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता इतरांचीच मोठी गर्दी असते. सहज इंधन उपलब्ध होत असल्याने फिरनेही तेवढेच सोपे झालेले आहे.
दरम्यान रुग्णवाहिका, आरोग्य, पोलीस आणि अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्या वाहनांनाच इंधन दिले आणि इतरांना जर प्रतिबंध केला तर वाहने घेऊन विनाकारण फिरणारे रस्त्यावर दिसणार नाहीत. त्यामुळे पंपावर येणाऱ्या वाहनांना पास असल्याशिवाय आणि त्यांची नोंद केल्याशिवाय इंधन देऊ नये असा सूर बहुतांश लोकांचा आहे.