Site icon सक्रिय न्यूज

अंबाजोगाई येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नविन इमारतीचे उद्घाटन संपन्न……!

अंबाजोगाई दि.८ ( पांडुरंग केंद्रे) अंबाजोगाच्या वैभवात भर टाकणाऱ्या इमारतीचे उद्घाटन  करताना आनंद होत आहे या न्यायालयाच्या माध्यमातून निकाल देत असताना सर्व सामान्यांच्या अपेक्षा, कायदेशीर बाबींचा उहापोह, राज्यघटनेने व इतर कायद्यानी जनतेला दिलेल्या अधिकाराचे जतन व्हावे आणि न्यायदान लवकर व्हावे अशी अपेक्षा असल्याचे प्रतिपादन उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील न्यायमुर्ती तथा बीड जिल्ह्याच्या पालक न्या. विभा कंकणवाडी यांनी व्यक्त केले. अंबाजोगाई येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नविन इमारतीच्या  उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.                               बहुप्रतिक्षित असलेल्या अंबाजोगाई येथील दिवाणी फौजदारी न्यायालयाच्या नविन प्रशस्त आणि सुसज्ज इमारतीचे आॅनलाईन उद्घाटन शुक्रवारी (दि. ७ ) न्या. कंकणवाडी यांच्या हस्ते संपन्न झाले. कोरोना प्रादुर्भावामुळे हा कार्यक्रम आभासी व्हर्चुअल स्वरूपात पार पाडला.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीड जिल्ह्याचे न्या. हेमंत महाजन तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेचे सदस्य अॅड वसंत साळुंके न्या.वा. ज. दैठणकर , अंबाजोगाई वकील संघाचे अध्यक्ष अॅड शरद लोमटे, सदस्य पद्मा कुपकर हे होते.
                     पुढे बोलताना न्या. कंकणवाडी म्हणाल्या की, कोरोना प्रादुर्भावामुळे प्रत्यक्ष हजर राहु शकले नसले तरी परिस्थिती निवळल्यास मी अंबाजोगाईला अवश्य भेट देईल आणि संपुर्ण पहाणी करुन वकिलांच्या सर्व मागण्यांबाबत निर्णय घेईन.
                   कार्यक्रमाचे प्रास्ताविक न्या. हेमंत महाजन यांनी केले अॅड शरद लोमटे यांनी वकील सदस्यांच्या अनेक मागण्या पालक न्यायमुर्ती, प्रमुख जिल्हा न्यायाधीश व वकील परिषद यांच्या समोर मांडल्या.या सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन मान्यवरांनी दिले. यावेळी जिल्हयाचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेला शुभारंभ संदेश अॅड शरद लोमटे यांनी वाचुन दाखवला.  पालकमंत्र्यांनी नुतन इमारतीचे उद्घाटनानिमित्त  सर्व न्यायमुर्ती, विधिज्ञ यांना शुभेच्छा दिल्या व यापुढेही राज्य सरकारच्या वतीने न्यायालयास अवश्य तिथे निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन संदेशाद्वारे दिले.
              कार्यक्रमास  अंबाजोगाई न्यायालयातील मोजके वरिष्ठ वकील, न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते. या वेळी अंबाजोगाई शहर आणि न्यायालयाच्या इतिहासाची चित्रफित दाखवण्यात आली. तसेच अॅड शरद लोमटे यांनी वकील संघास संघनक भेट दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन न्या. जे. एस. भाटिया यांनी केले तर अभार प्रदर्शन न्या. इ. के. चौगुले यांनी केले.
शेअर करा
Exit mobile version