अंबाजोगाई दि. ८ ( पांडुरंग केंद्रे)
कोवीडच्या दुसऱ्या लाटेनेच हाहाःकार माजवलेला असतांनाच तिसऱ्या लाटेचा सक्षम लढा देण्यासाठी विधान परिषदेचे सदस्य संजय पंडीतराव दौंड यांनी येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास पाच व्हेंटीलेटर व इतर वैद्यकीय उपकरणे खरेदीसाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे . ही यंत्रसामुग्री खरेदीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे.
कोवीडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून राज्य शासनाने सर्व आमदारांनी आपला एक कोटी रुपयांचा निधी आपापल्या मतदारसंघात कोवीड रुग्ण सेवेसाठी वापरण्याचा अधिकार दिला आहे. येथील आमदार संजय पंडीतराव दौंड यांनी येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कोवीड विभागासाठी पंचाहत्तर लाख रुपये किंमतीचे ५ एन. आय .सी.यु. व्हेंटिलेटर, जिला कंपनीचे १० रेडीयंट वॉर्मर, (५ लक्ष), फिलीप्स जीई कंपनीचे ६ नॅशनल मॉनिटर (६ लक्ष), एण्डस्कोपी स्पायनस सर्जरीसाठी २ मायक्रोडिब्रेडर (१४ लक्ष) ही यंत्रे आमदार निधीच्या स्थानिक विकास कार्यक्रम सन २०२१-२२ मधुन शासनाने निर्देशीत केलेल्या आमदार फंडातून तात्काळ खरेदी करण्याविषयीचे पत्र बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
आमदार संजय पंडीतराव दौंड यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे, कोरोना विषाणुने राज्यात सध्या घातलेले थैमान व भविष्यातील तिसरी लाट गृहीत धरता कोविड १९ बाधित रुग्णांच्या उपचाराकरिता वरील यंत्रसामुग्री स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक आहे. तरी सदरील यंत्रसामुग्री तातडीने उपलब्ध करुन देण्यात यावी .