बीड दि.९ – सध्या सर्वत्र कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. यातील कांही रुग्ण शासकीय कोविड रुग्णालयात तर कांही रुग्ण मान्यताप्राप्त खाजगी कोविड रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र कांही खाजगी रुग्णालये उपचारासाठी दाखल झाल्यानंतर स्वतः कांही खातरजमा करून पॉजिटिव्ह रुग्णांना होम आयशोलेशन ची परस्पर परवानगी देत आहेत. मात्र तसे अधिकार खाजगी रुग्णालयांना दिलेले नसून खाजगी डॉक्टर्सनी परस्पर सदरील सुविधा देऊ नये असे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले आहेत.
बीड जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. दररोज सरासरी दीड हजारांपर्यंत रुग्णांची नोंद होत आहे. यातील बहुतांश रुग्ण शासकीय रुग्णालयात भरती होतात. तर कांही रुग्ण मान्यताप्राप्त खाजगी रुग्णालयात उपचार घेतात. यामध्ये ज्या रुग्णांना सौम्य लक्षणे असतील त्यांना तालुका आरोग्य अधिकारी नियम व अटीवर अश्या रुग्णांना होम आयशोलेशन ची परवानगी देतात.मात्र कांही खाजगी रुग्णालये शासकीय यंत्रणेला सूचित न करता परस्पर होम आयशोलेशन ची परवानगी त्यांचा पातळीवर देत असल्याचे निदर्शनास आले आहे.
वास्तविक पाहता खाजगी रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांना होम आयशोलेशन ची परवानगी पाहिजे असेल तर अश्या रुग्णांनी संबंधित तालुक्यातील सामान्य रुग्णालय अथवा सीसीसी मध्ये जाऊन तिथल्या डॉक्टर्स कडून तपासणी करून घेणे व सदरील रुग्णास ही सुविधा देणे योग्य आहे असा अभिप्राय तालुका आरोग्य अधिकाऱ्यास दिल्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी त्यांच्या अधिकारात रुग्णांना होम आयशोलेशन ची परवानगी देत असतात. कारण होम आयशोलेशन चे सर्वस्वी अधिकार हे केवळ तालुका आरोग्य अधिकारी यांनाच आहेत. त्यामुळे खाजगी रुग्णालयांनी शासकीय यंत्रणेच्या परस्पर होम आयशोलेशन ची परवानगी देऊ नये, कारण हे आपत्ती व्यवस्थापन नियमांचा भंग आहे असे आदेश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी खाजगी रुग्णालयांना दिले आहेत.