Site icon सक्रिय न्यूज

पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्यावर कारवाईची मागणी……!

बीड दि.१० – वार्तांकन करण्यास गेलेल्या पत्रकाराला अपमानास्पद वागणूक दिल्याचा प्रकार रविवारी (दि.९) पेठ बीड ठाण्यात घडला. याचा निषेध करुन पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी सोमवारी (दि.१०) पत्रकारांनी केली. यासाठी पत्रकारांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना भेटले.
                   शहरातील पेठ बीड ठाणे हद्दीतील अवैद्य धंदे, सोयीनुसार होणाऱ्या कारवाया, फिर्यादींना मिळणारी अपमानास्पद वागणूक या संदर्भाने माध्यमांमध्ये अनेकदा बातम्या आलेल्या आहेत. काही पत्रकारांवर खोटे गुन्हेही नोंद केले गेले आहेत. ९ मे रोजी पेठ बीड ठाण्यात वार्तांकनासाठी गेलेले पत्रकार अक्षय रडे यांना पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी अपमानास्पद वागणूक दिली. या घटनेचा पत्रकारांनी निषेध व्यक्त केला. सोमवारी पत्रकारांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या भेटीला गेले. यावेळी पोलीस निरीक्षक पाटील यांच्यावर कारवाईची मागणी पत्रकारांनी लावून धरली. जिल्हाधिकारी रवींद्र जगताप व पोलीस अधीक्षक आर.राजा यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी निवेदन स्वीकारून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
शेअर करा
Exit mobile version